आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी समोर असूनही पोलिस बसले बघत; पोलिसांच्या नाकर्तेपणाबाबत नगरकरांमध्ये तीव्र असंतोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एखाद्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी आकाश-पाताळ एक करणारे पोलिस आरोपी असलेल्या राजकीय व्यक्तींना कसे अभय देतात, याचे उत्तम उदाहरण नगरकरांना नुकतेच पहायला मिळाले. केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातुपते व माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे मंगळवारी चक्क अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्यासोबत दिसून आले. परंतु राठोड यांची अटक तर दूरच त्यांची साधी चौकशी करण्याची हिंमतही पोलिसांनी दाखवली नाही. पोलिसांच्या या नाकर्तेपणाची उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे. 


केडगाव दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी तथा शिवसेना कार्यकर्ते आतपर्यंत शहरात उजळ माथ्याने फिरत होते. परंतु आता हेच आरोपी चक्क पोलिसांबरोबर दिसून येत आहेत. हत्याकांडातील मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटूंबियांच्या वतीने सुरू असलेल्या उपोषस्थळी मंगळवारी दुपारी हे चित्र दिसून आले. अपर पोलिस अधीक्षक पाटील यांनी उपोषकत्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यावेळी तेथे चक्क दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल असलेले आरोपी राठोड, सातपुते व कदम उपस्थित होते. याप्रसंगी आरोपी राठोड यांनी वरीष्ठ पोलिस अधिकारी पाटील यांच्याशी उपोषणकत्यांबाबत चर्चा केली. राठोड यांच्या विराेधात गुन्हा दाखल असल्याचे पाटील जाणीवपूर्वक विसरून गेले. एखादा वरिष्ठ पोलिस अधिकारी आरोपी समोर असूनही त्यांच्यासोबत मवाळकीने चर्चा करत गप्प कसा बसू शकतो, असा प्रश्न यानिमित्ताने नगरकरांसमोर िनर्माण झाला. केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नागरिकांच्या घरांवर व पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध करणारे, तसेच पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करणारे हे आरोपी सव्वा महिन्यांपासून शहरात उजळ माथ्याने फिरत आहेत. आता तरी चक्क वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या समोर असूनही या आरोपींना अटक होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


कृष्णप्रकाश यांनी केली होती अटक 
शिवसेना उपनेते अिनल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल असूनही वरिष्ठ पोिलस अिधकारी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याच राठोड यांना मात्र तत्कालीन पोिलस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली होती. राठोड यांनी अितक्रमणे हटवण्यास विरोध केला होता. केडगाव दगडफेकप्रकरणी कृष्णप्रकाश यांच्यासारखी खमकी भूमिका घेत आताचे पोलिस राठोड यांना अटक करण्याचे धाडस करतील का? अशी चर्चा शहरात सुरु आहे. सोशल मीडियावरही ही चर्चा जोरदार सुरु आहे. 


मंत्र्यांनाही केला फोन 
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केडगाव दगडफेक प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम केले. दगडफेक ही एक "नैसर्गिक प्रतिक्रिया' आहे, असे वक्तव्य देखील याच मंत्रीमहोदयांनी केले. मंगळवारी दुपारी उपोषणकर्त्यांशी चर्चा सुरू असताना आरोपी राठोड यांनी याच मंत्रीमहोदयांना फोन केला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक पाटील यांचेही मंत्रीमहोदयांशी बोलणे झाले. जेथे आरोपीच थेट गृह राज्यमंत्र्यांशीच बोलतात, तेथे या आरोपींना अटक करण्याचे धाडस पोलिस कसे दाखवतील, असा प्रश्न नगरकरांसमोर निर्माण झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...