आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या नेत्यांच्या नावांबाबत गुप्तता बाळगत दोषारोपपत्र केले दाखल, सीआयडीची भूमिका संशयास्पद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव येथील शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्याकांडप्रकरणी सीआयडीने शुक्रवारी ८ आरोपींविरुद्ध न्यायालयात दाेषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुद्ध अजून तपास करायचा असल्याचे, तर इतर आरोपींबाबत तपास करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र फिर्यादीतील आरोपींमध्ये समावेश असलेल्या बड्या नेत्यांची नावे दोषारोपपत्रात आहेत किंवा नाही, याबद्दल सीआयडीने कमालीची गोपनीयता बाळगत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यामुळे सीआयडीच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. 


केडगाव उपनगरातील शाहूनगर परिसरात ७ एप्रिलला सायंकाळी संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या झाली. सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, नंतर विशेष तपास पथकाने तपास करुन प्रमुख आरोपींना अटक केली. त्यांची वेळोवेळी चौकशी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले. पण पोलिसांच्या तपासावर राजकीय नेत्यांचे आरोप झाल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ३८ दिवस, तर सीअायडीने सुमारे ५२ दिवस तपास केला. मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी न्यायालयात ते दाखल झाले. 


शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सीआयडीचे तपासी अधिकारी व त्यांचे पथक जिल्हा न्यायालयात आले. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोणाविरुद्ध काय आरोप ठेवले जातात, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यामुळे न्यायालयात सायंकाळपर्यंत गर्दी होती. खबरदारीचा उपाय म्हणून भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता. त्यांच्या संरक्षणात सीआयडीचा ताफा मागमूस लागू न देता, कोणतीही माहिती न देता निघून गेला. आरोपींच्या वकिलांनाही दोषारोपपत्राची प्रत मिळाली नव्हती. 


शुक्रवारी सीआयडीने जे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले, त्यात आठ आरोपींविरुद्ध दोष ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याशिवाय सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब भानुदास कोतकर यांच्याबद्दल मात्र फौजदारी दंड संहितेच्या कलम १७३ (८) नुसार अधिक तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले. या गुन्ह्यात इतर आरोपींच्या सहभागानुसार टप्प्याटप्याने दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

 
मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम याच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, अशोक लांडे खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आरोपी भानुदास कोतकर व संदीप काेतकर यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संदीप गुंजाळ, संदीप गिऱ्हे, विशाल कोतकर, रवी खोल्लम, पप्पू मोकळे, बाबासाहेब केदार यांच्यासह इतर आरोपींनी हत्याकांड घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी गुंजाळ याने स्वत: पोलिसांसमोर हजर होत गुन्ह्याची कबुली दिली होती. 


यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र 
भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप बाळासाहेब गिर्हे, महावीर रमेश मोकळे, अशी आठ आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून करणे, खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पुन्हा खून करणे, जमाव गोळा करणे, दंगल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, आर्मअॅक्टसह इतर कायदा कलमांन्वये आरोप आहेत. शनिवारी सुनावणी होऊन हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग केला जाईल. 


गोपनीयता कशासाठी? 
पोलिसांकडे तपास होता तेव्हा तपासातील प्रगतीचा अहवाल माध्यमांना सांगितला जात होता. सीआयडीने मात्र, गोपनीयता बाळगून दोषारोपपत्र सादर केले आहे. 


मग सीआयडीने काय केले? 
एलसीबी व विशेष तपास पथकांनी सुरुवातीच्या तपासात गुन्ह्यातील दहा आरोपींना अटक केली. त्यांची वेळोवेळी चौकशी करून आवश्यक ते पुरावे पोलिसांनी गोळा केले. मात्र, पोलिसांच्या तपासाबाबत राजकीय नेत्यांनी आरोप केल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ३८ दिवस, तर सीअायडीने आतापर्यंत ५२ दिवस या गुन्ह्याचा तपास केला. त्यांच्याकडे तपास वर्ग झाल्यानंतर एकाही अतिरिक्त आरोपीला अटक झालेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...