आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. कर्डिले सोमवारी (९ एप्रिल) सकाळी कॅम्प पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपताच त्यांना मंगळवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढवल्याने कर्डिले यांना जामीन मिळू शकला नाही. दरम्यान, तोडफोड करणाऱ्या २२ जणांची पोलिस कोठडी देखील मंगळवारी संपली. मात्र, न्यायालयाने त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 


केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी शनिवारी (७ एप्रिल) रात्री १० च्या सुमारास शहराचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले. यावेळी त्यांच्या दोनशे ते अडीचशे समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी अडीचशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात आमदार कर्डिले यांचाही समावेश होता. कर्डिले सोमवारी सकाळी कॅम्प पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांना न्यायालयासमाेर हजर करण्यात आले. न्यायालयाकडून जामीन मिळेल, अशी कर्डिले व त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. निकाल ऐकण्यासाठी कर्डिले समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, न्यायालयाने कर्डिले यांचा जामीन नाकारत त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची (१२ एप्रिलपर्यंत) वाढ केली. त्यामुळे कर्डिले समर्थकांचा हिरमोड झाला. तोडफोडप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला भादंवि ३३३ हे कलम (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकास इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे) लावले होते. परंतु वैद्यकीय अहवालात संबंधित कर्मचाऱ्यास िकरकोळ जखमा झाल्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी भादंवि ३३३ हे कलम वगळून भादंवि ३३२ हे कलम लावले. दरम्यान, कर्डिले यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी पोलिसांनी भादंवि ३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढवले. त्यामुळे कर्डिले यांना जामीन मिळण्याऐवजी त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. कर्डिले यांच्यासह केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले आमदार संग्राम जगताप यांना गुरूवारी (१२ एप्रिल) पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दोघांना जामीन मिळतो, की त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी होते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

 
कर्डिले यांच्याविरोधात सबळ पुराव्यांचा शोध 
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब एकनाथ कोतकर, संदीप गुंजाळ व भानुदास कोतकर ऊर्फ बीएम (केडगाव) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी अटकेत असलेले आमदार कर्डिले यांचे नावही केडगाव दुहेरी हत्याकांडात आहे. त्यामुळे तोडफोड प्रकरणातून जामीन मिळाला, तरी त्यांना केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, हत्याकांड प्रकरणी कर्डिले यांच्याविरोधात पोलिसांकडे अद्याप कोणतेच सबळ पुरावे नाहीत. 


२२ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अडीचशे जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २२ जणांना रविवारी (८ एप्रिल) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी स्वत: हून हजर झालेले सुरेश बनसोडे, अफजल शेख व सारंग पंधाडे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...