आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळेधारकांच्या प्रश्नासाठी महासभा बोलावण्याचे नियोजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या मालकीच्या इमारतीतील भाडोत्री गाळेधारकांकडील थकबाकी न भरल्यास गाळे सील करण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारकांनी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. महापौरांसमवेत चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी या प्रश्नावर महासभा बोलावण्याच्या तयारीत आहे. तत्पूर्वी सोमवारी (१६ जुलै) प्रशासनासमवेत संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

 

शहरातील महापालिकेच्या विविध इमारतींतील साडेपाचशे गाळेधारकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडील थकबाकी सात दिवसांत जमा करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. या मुदतीनंतर पैसे जमा नसलेले गाळे सील केले जाणार आहेत. सोमवारपासून ही कारवाई होण्याची शक्यता आहे. गाळेधारक संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने शनिवारी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी महापौर सुरेखा कदम, स्थायी समिती सभापती बाबा वाकळे, सभागृहनेता गणेश कवडे, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, विक्रम राठोड, सचिन जाधव, संभाजी कदम, सुरेश तिवारी यांच्यासमवेत गाळेधारकांनी चर्चा केली. या वेळी मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र दळवी, रवी चव्हाण, लक्ष्मीकांत हेडा, अल्ताफ शेख, सुनील आंबेकर, किशोर चोपडा, सतीश बत्तीन, राजू लोंडे, जनार्दन वाघ, दिलीप शिंदे, मामा बागडे आदी उपस्थित होते.

 

मनपाने केलेली भाडेवाढ मूळ भाड्याच्या २०० ते ३०० पट आहे. ही वाढ गाळेधारक भरू शकणार नाहीत. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस उपाय केले नाही. याउलट गाळेधारकांना नोटिसा देऊन भाडे भरा; अन्यथा गाळे सील करण्याचे कळवले असल्याचे गाळेधारकांनी सांगितले.


या चर्चेनंतर सोमवारी (१६ जुलै) सकाळी १० वाजता सर्व गाळेधारक, महापौर, उपमहापौर, नगरसेवकांसह अधिकारीच्या उपस्थितीत बैठक बोलावण्याचे ठरले आहे. दरम्यान, प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच विशेष महासभा बोलावून गाळेधारकांच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा करण्याचे नियोजन आहे.

बातम्या आणखी आहेत...