आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशक्त पोलिस अधिकाऱ्यांमुळे समाजात शांतता अबाधित राहते -पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोणत्याही शहराची गावाची कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहण्यासाठी दक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी शरीर व मनाने तंदुरुस्त असणे आवश्यक असते. पोलिस दलात महिला अधिकारी, कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असतात. त्यांनी स्वत:च्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी व मनाने सशक्त असलेल्या अधिकाऱ्यांमुळेच समाजातील, शहरातील शांतता अबाधित राहून आनंदी वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. 

 

पोलिस कल्याण सप्ताहांतर्गत महिला पोलिसांसाठी आयोजित आरोग्यविषयक कार्यशाळेत ते बोलत होते. माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अमोल जाधव यांनी महिला पोलिसांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्यासह जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
घनश्याम पाटील म्हणाले, सरस्वती हॉस्पिटलतर्फे निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी सकारात्मक दृष्टिकोनातून जागृती करण्यात येत आहे. डॉ. जाधव यांनी या आधीही पोलिस मुख्यालयात महिला पोलिस व पोलिसांच्या कुटुंबातील महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन व तपासणी उपक्रम राबवले आहेत. त्याचा पोलिस कर्मचाऱ्यांना चांगला फायदा झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. डॉ. जाधव म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची, घरादाराची पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात. काम करताना ते ताणतणावांचा सामना करतात. यातून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. विशेषत: महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून नोकरीतील जबाबदाऱ्याही तितक्याच ताकदीने पार पाडव्या लागतात. अशावेळी त्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याप्रती अधिक सजग रहायला हवे. गरोदर असताना आपली ड्युटी बजावताना तसेच बाळंतपणाची रजा संपवून पुन्हा ड्युटीवर हजर झाल्यावर आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या काळात योग्य आहार, विहार, नियमित तपासणी, औषधोपचार घेतला पाहिजे. पाळीच्या समस्यांसाठीही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वेळीच उपचार घेतल्यास भविष्यात होणारा त्रास कमी होऊ शकतो. स्त्रियांमधील स्तनाचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, तसेच अन्य प्रकारचे कॅन्सर याबाबत प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याबाबत डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन केले. बदललेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पीसीओडी संदर्भात तक्रारी, वजन वाढणे, थायरॉईडच्या समस्या प्रकर्षाने वाढत आहेत. त्यासाठी तणावमुक्त राहणे, ड्युटीच्या वेळा सांभाळताना, घरातील कर्तव्य बजावताना स्वत:साठी आवर्जून वेळ काढणे, एखादा छंद असेल, तर तो जोपासणे, संगीत ऐकणे, हलका व्यायाम करणे अशा गोष्टी नियमित केल्यास शरीर व मन प्रफुल्लित राहते. 


आरोग्य चांगले ठेवणे महत्त्वाचे 
आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात धडाडीने काम करतात. पोलिस दलातील नोकरी ही अनेक आव्हानांची असते. ही आव्हाने पेलून कर्तव्य बजावण्याचा आनंद मिळण्यासाठी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोग्य चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी वेळोवेळी स्त्री रोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आवश्यक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत, असे आवाहन डॉ. अमोल जाधव यांनी पोलिसांना केले. 

बातम्या आणखी आहेत...