आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडगावच्या बहादूरगडाचे भाग्य लवकरच उजळणार; किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम चालू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- श्रीगोंदे तालुक्यातील बहादूरगडाचे (धर्मवीरगड) भाग्य लवकरच उजळणार आहे. किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव पुरातत्त्व व पर्यटन विभागाची मान्यता घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींना सादर करण्यात आला.

 
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे आणि पेडगावच्या सरपंच सुलोचना कणसे यांनी हा प्रस्ताव सादर केला. याप्रसंगी उपसरपंच देविदास शिर्के, भगवान कणसे, गणेश झिटे, बाळासाहेब नवले, नारायण कणसे, प्रकाश घोडके, श्रीगोंदे सांस्कृतिक वारसा संवर्धन ट्रस्टचे सचिव प्रा. डॉ. नारायण गवळी, विश्वस्त प्रा. डॉ. श्यामराव लवांडे, गोरख नागवडे, शिवदुर्ग संवर्धन समितीचे कार्यकर्ते नीलेश खेडकर, देवेंद्र अवचर, व्यसनमुक्त युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष शहाजी काळे, उपाध्यक्ष प्रा. मारुती शेळके आदी उपस्थित होते. 

या दुर्लक्षित किल्ल्याचा विकास करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विभागाकडे सादर करावा, अशी शिफारस पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. भीमा नदीकाठी असलेल्या या किल्ल्याचे निसर्गरम्य स्थान, छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्यात दाखवलेले अतुलनीय धैर्य, तसेच अष्टविनायकांपैकी सिध्दटेक हे नजीक असलेले स्थान, श्रीगोंद्यातील प्राचीन मंदिरे ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पर्यटनमंत्र्यांनी या ऐतिहासिक किल्ल्याचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. नागवडे यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. 


या प्रस्तावात टप्प्याटप्प्याने विविध विकासकामे सुचवण्यात आली आहेत. प्रथम किल्ला परिसरातील काटेरी झुडपे काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करणे, तटबंदीच्या आतून पदपथ, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची सोय, उद्याने, स्वच्छतागृह, किल्ल्यापर्यंत जाणारे रस्ते पक्के करणे आदी बाबी सूचवल्या आहेत. नंतरच्या टप्प्यात तटबंदीची डागडुजी, ऐतिहासिक वास्तू व मंदिरांचे पुरातत्त्वीय संवर्धन, माहिती देणारे फलक लावणे, संभाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेल्या शौर्यस्तंभ परिसराचे सुशोभीकरण, विखुरलेल्या वस्तू व शिल्पांचे संवर्धन होण्यासाठी संग्रहालय उभारणे, सांस्कृतिक भवन, संभाजी महाराज चरित्र अध्ययन व संशोधन ग्रंथालय, अद्ययावत व्यायामशाळा, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा या उद्देशाने दक्षिण तटबंदीला भीमेकाठी घाट, नौकानयन सुविधा, किल्ल्याच्या बाहेर छावणी परिसराचे सुशोभीकरण, वाहनतळ, भक्तनिवास, उपाहारगृहे अशी कामे सुचवली आहेत. 


छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृत्यर्थ अद्ययावत असे छत्रपती संभाजी महाराज नेत्रालय उभारणे, बहादूरगड किल्ल्यातील संभाजीराजांचे शासकीय पूजेचे शार्यस्थळ ते पुणे जिल्ह्यातील तुळापूर हे बलिदान स्थळ आणि वढू येथील समाधी स्थळ या पवित्र स्थानांना जोडणारा मार्ग पालखीमार्ग म्हणून विकसित करावा, असे सूचवण्यात आले आहे. 


किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम चालू 
पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून या विकास आराखड्याची मांडणी करण्याचे काम प्रा. डॉ. नारायण गवळी यांनी केले. या किल्ल्यात सध्या पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन समितीच्या वतीने सुशोभीकरणाचे काम चालू आहे. किल्ल्याच्या परिसराची विस्तीर्ण व्याप्ती आणि येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेता विकासासाठी शासकीय पाठबळाची आवश्यकता आहे. २०१३ पासून पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करून या विभागाच्या संकेताचे पालन करून हा विकास आराखडा तयार केला जात आहे. किल्ला परिसराची नुकतीच भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीही झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात असलेल्या वास्तूंच्या सभोवतालचे प्रतिबंधित क्षेत्र आणि संरक्षित क्षेत्र निश्चित करून त्या व्यतिरिक्त जागेत विकासकामे सुचवली आहेत.

बातम्या आणखी आहेत...