आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागातून बदली झालेल्यांचे धाबे दणाणले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबा संस्थानमधील सुमारे २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संस्थान अंतर्गत खातेनिहाय बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयानुसार संबंधित ठेकेदाराने पहिल्या टप्प्यात सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून बुधवारी आणखी शंभर बदल्या होणार अाहेत. दरम्यान, प्रसादालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुरक्षा विभागात बदल्या झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सुरक्षा विभागातील बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. 


वर्षानुवर्षे सुरक्षा विभागात काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास नकार देत आपली बदली होऊ नये, म्हणून पुढाऱ्यांच्या दारात खेटा मारायला सुरुवात केली आहे. बदलीच्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास संबंधित ठेकेदाराला मंजूर पॉइंटवर नवीन कर्मचारी संस्थानला पुरवावा लागणार असल्याने वशिल्याच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. 


दोन दिवसांपूर्वी संस्थान प्रशासनाने कार्यालयीन सोयीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदलीचा धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले. ठेकेदाराने पहिल्या टप्प्यात शंभर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात प्रसादालय व सुरक्षा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित शंभर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत. 


संस्थानमधील स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच अस्थायी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी संस्थान प्रशासनाने यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. प्रामाणिक कंत्राटी कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी आनंदाने कामावर हजर झाले आहेत, तर कामचुकार कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्याऐवजी पुढाऱ्यांचे उंबरे झिजवून आपली मुजोरी प्रशासनाला दाखवत आहेत. तथापि, संस्थानच्या प्रशासनाने कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराला मंज़ूर असलेल्या पॉइंटवर तातडीने कर्मचारी पुरवण्याची सूचना केल्याने मुजोर व कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 


सुरक्षा विभागात काम करणारे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. त्यांनी प्रशासनाला आव्हान देत आपली बदली रद्द करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने एकतर या कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या पॉइंटवर हजर व्हावे लागेल किंवा नोकरी गमवावी लागेल. 


अनेकजण वशिल्याचे तट्टू... 
साई संस्थानमध्ये मागील काही वर्षांपासून गुणवत्तेनुसार कंत्राटी कामगारांची भरती होण्याऐवजी ठेकेदाराने वशिल्याने भरती केल्याने प्रसादालय, रुग्णालय, सुरक्षा या विभागांचा पुरता बोजवारा उडाला आहे. वशिला असल्याने आमचे संस्थान प्रशासन काहीच करू शकत नाही, अशा अविर्भावात असलेल्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना नेत्यांनी पाठीशी घालू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...