आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरित लवादाच्या आदेशामुळे नगर परिषदेची 'कचराकोंडी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- स्वच्छ भारत अभियानात उत्तम कामगिरी करणाऱ्या संगमनेरमध्ये शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेने निर्णायक पावले टाकली असली, तरी ग्रामस्थांच्या विरोधामुळे कचराडेपोचा प्रश्न चिघळला आहे. हरित लवादाच्या आदेशामुळे नगरपरिषदेची 'कचरा कोंडी' झाली. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवणाऱ्या नगरपरिषदेला आता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पावले टाकावी लागणार आहेत. 


नगरपरिषदेच्या मालकीचा कचरा डेपो संगमनेर खुर्द येथे आहे. कुरण येथे नगरपरिषदेने कचरा डेपोसाठी प्रस्तावित केलेली मोकळी जागा पडून आहे. संगमनेर खुर्द येथील ग्रामस्थांनी कचरा डेपो अन्यत्र हलवण्यात यावा, या मागणीसाठी हरित लवादाचे दार ठोठावले. 


लवादानेदेखील पालिकेने तीन महिन्यांच्या आत संगमनेर खुर्द येथील कचऱ्यावर प्रक्रिया करुन कचरा नष्ट करण्याचे आदेश ११ जानेवारी २०१८ ला दिले. कुरण येथील जागेसंबंधी ग्रामस्थांशी चर्चा करुन मार्ग काढून जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते. 


स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यशस्वी कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदेसमोर कचऱ्याच्या विल्हेवाटीचे संकट उभे ठाकले आहे. संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोत नगरपरिषदेने गांडुळ खत निर्मिती प्रकल्प सुरु केला. मात्र, तरीदेखील कचऱ्याची समस्या कायम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नगरपरिषदेने प्रांताधिकाऱ्यांसमवेत मुख्याधिकारी सचिन बांगर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि कुरण येथील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. 


या बैठकीत कुरणच्या ग्रामस्थांनीही नगरपरिषदेच्या कचरा डेपाेला तीव्र विरोध केला. १ मे रोजी होत असलेल्या कुरण येथील ग्रामसभेत यासंबंधी निर्णय घेण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या अनुषंगाने कुरण ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारासमोर प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचाच फ्लेक्स लावून विरोध दाखवला. संगमनेर खुर्द आणि कुरण या दोन्ही ठिकाणी कचरा डेपोला ग्रामस्थांची तीव्र विरोध असल्याने कचरा विल्हेवाटीचे नवे संकट नगरपरिषदेसमोर उभे ठाकले आहे. 


कचऱ्यावर प्रक्रियेला सुरुवात 
राष्ट्रीय हरित लवादाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत तीन महिन्यांच्या आत अस्तित्वातील कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करावी आणि कुरण येथील जागेसंदर्भात नागरिकांशी चर्चा करून तोडगा काढावा असे निर्देश दिले आहेत. लवादाने निर्देशित केल्याप्रमाणे कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया व भूभराव क्षेत्र विकसित करण्यासंबंधीचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शहरातील कचरा संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोत टाकला जात असल्याने त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने तो हटवला जावा, अशी त्यांची मागणी आहे.
- डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...