आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात सीना नदीतून काढला ४० हजार ब्रास गाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सीना नदीच्या पात्रात वर्षानुवर्षे अतिक्रमणांचा बोजा चढवून उद्योग-व्यवसाय थाटणाऱ्यांना प्रशासनाने चांगलीच चपराक दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नियोजनबद्ध कारवाईमुळे बड्या धेंडांचीही पक्की अतिक्रमणे उद््ध्वस्त करण्यात आली. महिनाभरापासून सुरू असलेल्या या कारवाईत नदीपात्रातील सुमारे ४० हजार ब्रास गाळ काढण्यात आला. आतापर्यंत ३० ते ४० लहान-मोठी पक्की अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. आता चर खोदून नदीची सीमारेषा आखण्यात येत आहे. 


नगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीचा श्वास धनदांडग्यांच्या अतिक्रमणांमुळे कोंडला गेला होता. नदीकाठी व्यवसाय थाटणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने नदीपात्रच गिळंकृत करण्याचा सपाटा लावला होता. वर्षानुवर्षे स्थानिक मनपा, तसेच जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. ही नदी नगर शहरातून १४ किलोमीटर क्षेत्रातून वाहते. नदीकाठी गाळपेराच्या नावाखाली भराव टाकून शेती केली जाते. भराव पुढे सरकत गेले, तसे नदीचे पात्र अरुंद होत गेले. दीड वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सीना नदीच्या हद्द निश्चितीचे आदेश दिले होते. नदी जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील विषय असल्याने महसूल, मोजणी, जलसंपदा व मनपाच्या प्रशासनाने नदीपात्र नकाशाप्रमाणे मोजून पिवळ्या रंगाचे खांब हद्दीत रोवले. पण अतिक्रमण काढण्याची कार्यवाही त्यावेळी बारगळली होती. 


जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा पदभार आल्यानंतर त्यांनी मनपाला शिस्त लावण्यास सुरुवात केली. 'दिव्य मराठी'ने सीना नदीपात्राच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर द्विवेदी यांनी सीना नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला. २८ मेपासून सीना नदीपात्रातील गाळ काढण्यास सुरुवात केली. गुरुवारी (२८ जून) या कारवाईला महिना पूर्ण होणार आहे. महिनाभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे सीना नदीपात्रातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. प्रशासन केवळ भराव काढून गप्प बसेल असा अनेकांचा समज होता. परंतु सर्व तर्क फोल ठरवत नदीपात्रातील उभी पिके उद््ध्वस्त करण्यात आली. त्यापाठोपाठ नदीपात्रात हात-पाय पसरवून थाटलेली बेकायदा बांधकामे काढण्यात आली. शिल्पा गार्डन, नंदनवन लॉन, आनंद ट्रेडिंग, तसेच शिल्पा गार्डनमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वर्गखोल्यांची अतिक्रमणे उद््ध्वस्त करण्यात आली. 


या कारवाईसाठी महसूल, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक ठाण मांडून आहे. आता हद्द निश्चितीनुसार चर खोदायचे काम सुरू करण्यात आले आहे. तीन बाय तीनचा चर खोदून पात्राची सीमारेषा रेखाटली जात आहे. 


कारवाई सुरूच राहणार 
सोमवारी आनंद ट्रेडिंगचे बांधकाम काढले. भराव काढण्याचेही काम सुरूच आहे. पात्रात तीन बाय तीनचा चर खोदून हद्द निश्चित केली जात आहे. आतापर्यंत ३० ते ४० पक्की अतिक्रमणे काढली. महिनाभरात एक दिवस सुटी घेतली. तीन शिफ्टमध्ये आमचे काम सुरूच आहे. नदीकाठची उर्वरित सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहेत.'' सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख. 


असा काढला गाळ 
सीना नदीपात्रात सुरुवातीला वीस ते पंचवीस डंपर व तीन पोकलेनमार्फत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नदीपात्रातील सुमारे १० हजार गाळ वाहून नेण्यात आला. सुमारे ३० हजार ब्रास गाळ काढून नदीच्या कडेला तसाच बाजूला ढकलण्यात आला आहे. या मोहिमेमुळे नदीचा श्वास काही अंशी मोकळा झाला आहे. ही ऐतिहासिक कारवाई असल्याचे आता बोलले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...