आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनैश्वर देवस्थान प्रशासन, विश्वस्तांकडून अफरातफर; सरपंच बाळासाहेब बानकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- शनैश्वर देवस्थान शासनाने ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतर ट्रस्टचे विद्यमान प्रशासन व विश्वस्त मंडळाने दफ्तरात फेरबदल करत कामगार भरती, पगारवाढ व देवस्थानसंबंधित इतर खरेदीत मोठ्या प्रमाणावर अफरातफर करत फेरबदल केल्याची तक्रार शनिशिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


बानकर यांनी म्हटले आहे, ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी शासकीय अधिकारी येणार आहेत. ही घोषणा झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या मालकीचे व्यापारी संकुलातील दुकाने, गाळे व विविध व्यवसाय ११ महिन्यांच्या कराराने चालवण्यास देण्याबाबतची निविदा काढण्यात आली. या निविदेद्वारे देवस्थान ट्रस्ट प्रत्येक वर्षी ११ महिने कराराने गाळ्यांचे टेंडर काढते. हे टेंडर देताना माजी आमदार व त्यांच्या मर्जीतील ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आर्थिक देवाण-घेवाण करून गाळे आपल्या मर्जीतील नातेवाईकांना देतात. त्यामुळे गावातील व परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना गाळे मिळत नाहीत आणि मिळाले तरी मूळ टेंडर घेतलेल्या मर्जीतील व्यक्तीला चढ्या भावाने पैसे देऊन घ्यावे लागतात. या उपगाळेधारक व्यापाऱ्यांना जास्त पैसे द्यावे लागत असल्याने तेदेखील पूजा विक्री सामानाचे जास्त भाव लावून भाविकांना लुटतात. 


गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण विश्वस्त मंडळ हे माजी आमदारांच्या मर्जीतील व त्यांच्याच मुळा उद्योग समूहातील कामगार आहेत. देवस्थान ट्रस्ट सरकार जमा झाल्याची घोषणा झाल्यानंतर दफ्तरी बदल करून कर्मचारी भरती, पगार वाढ, तसेच देवस्थान ट्रस्ट संबंधित इतर खरेदी यात मोठ्या प्रमाणावर अफरातफर करत आहेत. 


ही टेंडर प्रक्रिया थांबवून शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखाली सरकारी नियमाप्रमाणे टेंडर प्रक्रिया व्हावी. तसेच ३ लाखांपेक्षा अधिक रकमेचे टेंडर हे ई टेंडर पद्धतीने झाल्यास अनेक स्थानिक सुशिक्षित बेकारांना गाळा भाडेपट्ट्यावर घेणे शक्य होईल व त्याचा देवस्थान, व्यावसायिक आणि भाविक यांना फायदा होईल, अशी मागणी सरपंच बाळासाहेब बानकर यांनी मुख्यमंत्र्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात केली आहे. 


बेकायदेशीर झालेल्या टेंडर प्रक्रियेचे पुस्तक 
या तक्रारअर्जासोबत १५ मे २०१६ ते १४ ऑगस्ट २०१७ आणि १५ ऑगस्ट २०१७ ते १४ जुलै २०१८ या कालावधीत बेकायदेशीररित्या झालेल्या टेंडर प्रक्रियेचे पुस्तक सरपंच बानकर यांनी जोडले आहे. 

बातम्या आणखी आहेत...