आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, नगरसेवक योगिराज गाडे यांच्यासह ६०० जणांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस व नागरिकांच्या घरांवर दगडफेक करत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, मृतदेहाची विटंबना, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल असलेल्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याने शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

 

शिवसेना केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शिवसैनिकांनी परिसरातील घरांवर व पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. मृतदेह ताब्यात घेण्यासदेखील त्यांनी विरोध केला. त्यामुळे हे मृतदेह मध्यरात्रीपर्यंत जागेवरच पडून होते. नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी कोतवालीचे सहायक फौजदार लक्ष्मण भिमाजी हंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात राठोड यांच्यासह ६०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंडाळ यांनी फिर्यादीत म्हटले की, गोळीबार झाला असल्याची माहिती एका महिलेने फोनवरून कळवली. त्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी दाखल झालो. संजय कोतकर व वसंत ठुबे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. तोपर्यंत पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह शिवसैनिकही तेथे हजर झाले. शिवसैनिकांनी पोलिसांना शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली. दगडफेकीत पाच पोलिस वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांवर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील शिवसैनिकांनी केला. मृतदेह घेण्यासाठी रुग्णवाहिका आली असता शिवसैनिकांनी मृतदेह नेण्यास मज्जाव करत मृतदेहांची विटंबना केली असल्याचे हंडाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 


हे आहेत आरोपी 
शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे, सचिन जाधव, विक्रम राठोड, दत्ता जाधव, विठ्ठल सातपुते, विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, अभिमन्यू राजू जाधव, संभाजी कदम, भय्या सातपुते, चंद्रकांत उजागरे, राजूपठारे, पिंटू मोढवे, रमेश परतानी, रावसाहेब नांगरे, विकी ऊर्फ विक्रम पाठक, संग्राम शेळके, विशाल गायकवाड, दीपक खैरे, नन्नू दौंडकर, शुभम बेंद्रे, विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, मुकेश जोशी, बाळासाहेब बारस्कर, रणजित ठुबे, सचिन ठुबे, प्रफुल्ल साळुंके, गोविंद वर्मा, चेतन वर्मा, विकी भालेराव, नयन गायकवाड, सागर दळवी, सागर गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, रमेश भाकरे महाराज, दीपक कांबळे, सचिन राऊत, दीपक धेंड, सुनील राऊत, रवी वाकळे, मदन आढाव, आदिनाथ राजू जाधव, मनोज चव्हाण, बंटी सातपुते, अंगद महानवर, अशोक दहिफळे, ऋषभ अंबाडे, प्रतीक अर्जुन गर्जे, सुशांत म्हस्के, तेजस गुंदेचा, कुणाल ऊर्फ बंटी खैरे, नरेश ऊर्फ गुड्डू भालेराव, लंकेश हरबा, उमेश काळे, अक्षय भांड, दत्ता नागापूरे, गिरीश शर्मा, नितीन चौबे, शुभम परदेशी, सुनील लालबोंद्रे, मुकेश गावडे, समीर सातपुते, अमोल येवले व इतर ६०० जण. 


कोणत्याही क्षणी अटकसत्र 
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी व सुमारे ६०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी घटना घडली, तेथील सुमारे ३० ते ४० घरांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. केडगावातील एका पतसंस्थेचे कार्यालय देखील फोडले, पोलिसांवर दडगफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मृतदेहाची सुमारे ६ ते ७ तास विटंबना केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही क्षणी आरोपींचे अटकसत्र सुरू होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...