आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम दुष्काळ असणाऱ्या बोंदर्डीची पाणीदार गावाकडे वाटचाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरजगाव- मिरजगावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या बोंदर्डी गावात दुष्काळ कायमचा वस्तीला राहायचा, दरवर्षी सततचा दुष्काळ यामुळे शेती कायमची निकामी झाली, शेतकरी कर्जबाजारी झाला. यास कंटाळून मिरजगाव येथील काही तरुणांनी दुष्काळाला कायमचे पिटाळून लावण्यासाठी निश्चय केला. पाण्याचे मोल जाणून घेण्यासाठी व दुष्काळाबरोबर लढता यावे म्हणून पाणी फाउंडेशचे प्रशिक्षण घेतले. आपणहून श्रमदानाला सुरुवात केली. त्यासोबतच इतरांना श्रमदानाची साद घातली. दोनाचे चार झाले चारचे शेकडो झाले. त्या हातांनी पावसाच्या पडणाऱ्या पाण्यासाठी हक्काचे घर तयार केले. आता पडणाऱ्या पावसाच्या थेंबा-थेंबाला हक्काचे घर मिळाले आहे. त्यामुळे या ठिकाणी ४७ कोटी लिटर पाणी साठवून राहणार असून येथील दुष्काळ कायमचा दूर होणार आहे. 


मिरजगावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या बोंदर्डी गावची ही स्थिती आहे. बोंदर्डी हे गाव नेहमीच दुष्काळी गाव म्हणून प्रसिद्ध होते. या ठिकाणी दरवर्षीच पावसाळ्याच्या चार महिन्यांनंतर पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागत होती. या दुष्काळी स्थितीमुळे येथील शेतीही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. त्यामुळे तोट्यातील शेती व कर्जबाजारी शेतकरी ही येथील अवस्था होती. मिरजगावमधील काही तरुणांनी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेतले व येथील दुष्काळाबरोबर दोन हात करण्याचा निश्चय केला. त्यांनी व गावातील नागरिकांनी केलेल्या श्रमदानाने बोंदर्डी गावचा संपूर्ण कायापालट केला आहे. 
बोंदर्डी गावात सीसीटी, डीप सीसीटी, कम्पार्टमेंट बंडिंग, एलबीएस, नदीनाले खोलीकरण, शेततळे, माती परीक्षण, शोष खड्डे, नर्सरीद्वारे रोपे निर्मिती व आगपेटी मुक्त शिवार अशी कितीतरी कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यासाठी राजेंद्र गोरे, बबन म्हस्के, प्रशांत सोनवणे, अर्चना गोरे, कविता म्हस्के, मीनाक्षी फरताडे, वर्षा म्हस्के, प्रीती वारंगुळे, प्रियंका बनकर, विशाल म्हस्के, दादा वारंगुळे, व आदिराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी श्रमदान करून येथे विविध कामे केली आहेत. त्यासोबत कर्जत तालुक्यातील कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कृषी सहायक विश्वास तोरडमल यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यासोबत भारतीय जैन संघटनेने पोकलॅन व जेसीबी ही मशिनरी देऊन यांत्रिकीकरणाची कामे करण्यात आलेली आहेत. 


गावातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवायचाच या इर्षेने ग्रामस्थ, कार्यकर्ते या ठिकाणी श्रमदान करत होते. त्यामुळे दुष्काळ मुक्तीचे हे काम कोणा एकट्या दुकट्याचे नाही अशी भावना झाल्याने सर्व एकवटून येथे श्रमदान करत होते. या ठिकाणी हजारो हात एकत्र येऊन झटत होते. त्यामुळेच एवढे मोठे काम या ठिकाणी होऊ शकले आहे. जेथे नेहमीच टँकरयुक्त गाव होते. तेथे टँकरमुक्त गाव अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे. या ठिकाणी काम करताना नव्या पिढीतील तरुणवर्ग येथे श्रमदान करताना दिसत होता. त्यामुळे भविष्यातील श्रमदानाची बिजे येथे रोवली गेली आहेत. तसेच या ठिकाणी फाउंडेशनच्या निकषांप्रमाणे कामे करण्यात आल्याने हे एक आदर्श गाव निर्माण झालेले आहे. येथील कामांमुळे बोंदर्डी गावाच्या सभोवती पाणी अडवण्याचे काम करण्यात आलेले आहे. या भागात पडणारा पावसाचा थेंब न् थेंब अडवला जाणार आहे. पावसासाठी हक्काचे घर निर्माण झाल्याने येथील दुष्काळ कायमचा हद्दपार होईल, असा येथील लोकांना विश्वास आहे. 


बोंदर्डी होणार आदर्शगाव 
बोंदर्डी गावाने आपल्या नर्सरीच्या माध्यमातून १५०० रोपे तयार केलेली आहेत. वनखात्यामार्फत या ठिकाणी २००० रोपांची लागवड पावसाळ्यात करण्यात येणार आहे. एकीकडे प्रचंड पाण्याची साठवणूक व दुसऱ्या बाजूला मोठी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याने कधीकाळी दुष्काळी असणारे गाव एक आदर्श गाव निर्माण होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...