आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैयक्तिक स्वार्थासाठी शिर्डी शहराच्या विकासाला खो, विकासकामांसाठी एक छदामही खर्च नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याची समाप्ती ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. भाविकांना सामावून घेण्याची शिर्डीची क्षमता फक्त पाच लाखांची आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातून किमान १५ ते २० लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी ऐनवेळी प्राथमिक सुविधा कशा निर्माण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

अनेकदा घोषणा झालेले सर्वत्र सीसीटीव्ही, उद्यान, सुसज्ज व जास्त क्षमतेचे भक्तनिवास व भक्त निवारे, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ही कामे सुद्धा होऊ शकली नाहीत. अगदी मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात शिर्डी बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवून ते काम केलेले नाही. साई संस्थानच्या तिजोरीवनर कायम डोळा असणाऱ्यांचे व स्थानिक राजकीय नेत्यांचेही याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

 

या सोहळ्याला शुभारंभ गेल्या एक ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.या दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रपतीनी साईबाबांच्या वादग्रस्थ जन्मस्थळाचा उल्लेख करून नव्या वादाला सुरवात करून दिली. तरीही व्यासपीठावरील दिग्गज मूग गिळून गप्पच बसले. खरे तर, शिर्डीबद्दल राष्ट्रपतीनी केलेल्या या वक्तव्याबद्दल व्यासपीठावर उपस्थित राहिलेल्या दिग्गजांनी धरलेली गुळणी यातच बरेच काही गूढ आहे. मुळात शिर्डीच्या अर्थकारणाबद्दल अनेक राजकीय धुरिणांना असुया आणि भीतीही आहे. आपल्या राजकीय अस्तित्वाला शिर्डीतून राजकीय सुरुंंग लागतो की काय, याचीच भीती राजकीय धुरिणांना गेल्या अनेक वर्षंापासून वाटत आहे. साई समाधी शताब्दी वर्षातही शिर्डीत विकासाच्या नावाखाली काहीही घडले नाही. या बाबत शिर्डीतील सर्वसामान्य जनता व व्यावसाईक चिंताग्रस्त असले, तरी राजकारणी मात्र सध्याच्या शिर्डीच्या अधोगतीच्या परिस्थितीत निवांत आहेत.

 

विदर्भात गेले ५६ कोटी
शिर्डी शहरातील पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी संस्थानकडे दबाब वाढवण्या ऐवजी, दान पेटीतील पैसा बाहेर पळवला जात अाहे. याला कोणीही पायबंध घातलेला नाही, हे विशेष. आज संस्थानच्या असलेल्या आरोग्य सुविधेचा लाभ राज्यातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे खरे असले, तरी संस्थानची ही आरोग्य सेवाच शेवटची घटका मोजत आहे. तेथे पुरेशी औषधे नाहीत. तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. आधुनिक यंत्रसामग्री नाही. असे असताना विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांना ५६ कोटींच्या देणग्या देण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. जेष्ठ नेते शरद पवार केंद्रीय मंत्री असताना त्यांनी साईसंस्थानच्या माध्यमातून शिर्डी परिसरात नॉलेज सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी त्यांनी विजय भटकर यांच्यासारख्या दिग्गज तज्ज्ञांची कमिटी नेमली होती. सरकारही कामाला लावले होते. मात्र, कालांतराने या कामालाही खो बसला. याबाबत माशी कोठी शिंकली, हेही गुलदस्त्यात राहिले आहे.

 

राज्य सरकारचे शिर्डीकडे पूर्ण दुर्लक्ष
साईसंस्थान विश्वस्त समंडळाने साई समाधी शताब्दी वर्षात अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले होते. त्यांचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. मात्र, या निर्णयांची पुर्ती करण्यापेक्षा सरकारला व गॉडफादरला खुष करण्यातच विश्वस्त मंडळ मग्शुल आहे. गेल्या काही वर्षापासून संस्थानची प्रलंबित असलेले प्रकल्प पुर्णत्वास होेण्यासाठी जाणीवपूर्वक कामे करण्याऐवजी निधी बाहेर जाणार आहे. त्यामुळे कामे कशी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे. साई संस्थानच्या रुग्णालयांचे आधुनिकरण, शिर्डी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्थापन प्रकल्प, शिर्डी शहरातील रस्त्यांचा विकास व निर्मिती, साई वँक्स म्युझीयम, आयएएस अॅकेडमी, दर्शन रांग कॉम्प्लेक्स, ऐतिहासिक स्वागत कमान, साईनॉलेज पार्क, साई सृष्टी प्रकल्प, साई प्लँटोरियम व सायन्स पार्क, सौर उर्जा प्रकल्प, १२५ कोटी खर्चाचे कॅन्सर हाॅस्पिटलची निर्मिती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, स्काय वॉक, ग्रीन शिर्डी प्रकल्प, नवीन शैक्षणिक प्रकल्पांची उभारणी, नगरपंचायत हद्दीत रस्त्यांचे भुसंपादन, नगर-मनमाड रस्त्याची दरुस्ती व सुुशोभीकरण, साईटेक प्रकल्प, लाडूसाठी बुंदी प्रोसेसिंग युनीट, साई कला दालनाची निर्मिती आदी विकासाचे प्रकल्प शिर्डीच्या वैभवात भर घालणारे आहेत. ते पूर्ण होण्यासाठीआता जनतेनेच व्यापक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

शिर्डीचे दुखणे: शिर्डीच्या पाण्यालाही राजकीय रंग
शिर्डीसाठी आता निळवंडे धरणातून पाणी आणण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक पाहता, निळवंडे धरण प्रवरा खोऱ्यात असुन शिर्डी ,कोपरगाव हा भाग गोदावरीच्या खोऱ्यातला आहे. प्रवरेच्या तुलनेने गोदावरी खोऱ्यात मुबलक पाणी आहे. राहाता आणी कोपरगाव तालुक्यांना दारणा धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळत आहे.वास्तविक शिर्डीसाठी दारणा धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रस्ताव २००५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. जीवन प्राधिकरणाने या योजनेचा आराखडाही बनवला होता. मात्र, तत्कालीन साईसंस्थान विश्वस्त व्यवस्थेचे उपाध्यक्ष शंकराव कोल्हे यांनी कोपरगावचे पाणी कमी होईल, या भीतीने या पाणी योजनेला खो घातला. त्याएेवजी आता निळवंडेतून पाणी आणण्याचा घाट घातला जात आहे. गाेदावरी खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी शाबूत ठेवून प्रवरा खोऱ्यातील पाणी पाणी पळवण्याचा हा डाव आहे. प्रवरा खोऱ्यातील नेते मात्र तोंडावर बोट ठेवून आहेत. काही नेते तर उघडपणे याचे समर्थन करत आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा मात्र शिर्डी-कोपरगावला पाणी देण्यास ठाम विरोध आहे.

बातम्या आणखी आहेत...