आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणाचा वाद: कदम पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल; आज देवळाली बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा- राहुरी तालुक्याचे माजी आमदार व शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व त्यांचे पुत्र देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. नागरिकांनी शनिवारी आठवडे बाजारसह शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून देवळाली प्रवरा   परिसरात लोकसहभागामधून ओढ्या-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. नगराध्यक्ष कदम त्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमणे असल्यामुळे त्या नागरिकांशी चर्चा करून समेट घडून आणण्यासाठी नगराध्यक्ष किंवा चंद्रशेखर कदम हे नागरिकांच्या विनंतीनुसार जातात. परंतु ही बाब चुकीच्या अर्थाने पसरवून त्यांच्या विरोधात चांगुणाबाई ढूस यांना पुढे करून खोटा अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची चर्चा गुरुवारी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांचा रोष अनावर झाला. 


शुक्रवारी सकाळी शेकडो नागरिक व कार्यकर्ते चंद्रशेखर कदम यांच्या कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी कदम पिता-पुत्रावरील अदखलपात्र गुन्हा मागे घ्यावा, गावातील अवैध दारुविक्री, अवैध सावकारकी, मटका, जुगार आदी धंदे तातडीने बंद करावेत, सार्वजनिक जागेतील अतिक्रमणे तातडीने काढावीत यासाठी शनिवारी देवळाली प्रवरा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दुपारी एकपासून रिक्षावर लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून शहर बंदची हाक देण्यात येत होती. 


मंदिर पाडण्याची धमकी 
माजी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम हे ढूस वस्तीजवळील दत्त मंदिर व मंदिराभोवतीचे भिंतीचे कुंपण काढून घ्यावे; अन्यथा ते पाडण्यात येईल, अशी धमकी माझी दोन मुले अप्पासाहेब व अरुण यांना देत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार चांगुणाबाई ढूस यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. 


धमकी दिलेली नाही 
नगराध्यक्ष कदम म्हणाले, ढूस वस्तीजवळील ओढ्यात लोकसहभागातून रुंदीकरण व खोलीकरण सुरू आहे. मंदिराजवळील कुंपणाचे अतिक्रमण कमी केल्यास रस्ता सुकर होऊ शकतो. ते काढा किंवा कमी करा, अशी विनंती मी ढूस बंधूंना केली. धमकी वगैरे दिलेली नाही. तक्रारदारांच्या स्वयंघोषित आंतरराष्ट्रीय खेळाडू मुलाने हा पराचा कावळा केला. 

बातम्या आणखी आहेत...