आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरणगावजवळ दुधाचा टेंपो उलटून एक ठार; दौंड रस्ता दोन्ही बाजूंने खोदल्याने झाला अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर-दौंड रस्त्यावर अरणगावजवळच्या पुलावरील धोकादायक वळणामुळे पुसद येथील दूध वाहून नेणारा टेंपो (क्र. एमएच ४२ बी ३१३) उलटून रमेश चव्हाण या व्यक्तीचा मृत्यू, तर वर्षा चव्हाण ही महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास झाला. गाडीचा चालक घटनेनंतर फरार झाला. नगर-दौंड रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने खोदकाम केले आहे, पण त्याचे फलक न लावल्याने असे अपघात घडत असल्याचे शिवसेनेचे नेते संदेश कार्ले यांनी सांगितले. 


नगर-दौंड रस्त्याच्या कामात अनेक गडबडी आहेत. सत्ताधारी वर्तुळाशी असलेल्या संबंधांमुळे ठेकेदार अतिशय मनमानी पद्धतीने काम करत आहे. रस्त्याचे काम करताना त्याने दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या खोदून ठेवल्या आहेत. खोदकाम केलेल्या ठिकाणी कोठेही तसे इशारा देणारे फलक लावलेले नाहीत. कोठेही खडीचे ढीग टाकलेले आहेत. त्यावरून दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत. ठेकेदाराच्या मनमामीचा या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लहान-मोठे अपघातही होत आहेत. पण, संबंधित ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. बुधवारी सायंकाळी दौंडकडून नगरकडे येणारा दूध वाहून नेणारा टेंपो खोदकामामुळे अचानक उलटला. त्यात रोजंदारी येथे या भागात आलेले पुसद येथील जोडपे होते. त्यातील रमेश चव्हाण याचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी वर्षा गंभीर जखमी झाली. या अपघातात टँकरमधील सर्व दूध रस्त्यावर येऊन अक्षरश: पाट वाहत होता. रस्त्याचे खराब काम व त्यातून होणाऱ्या त्रासाबद्दल एमएसआरडीकडे ग्रामस्थांन तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने परिसरातील गावांतील ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...