आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचे भाव कोसळले, संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको; 1100 रुपये बाजारभाव देण्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत शनिवारी कांद्याचे भाव पुन्हा कोसळले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत लिलाव बंद पाडले. बाजार समितीने व्यापारी आणि शेतकरी यांचा समन्वय घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे स्थानिक नेते तेथे आल्याने काही शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोरच रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत शनिवारी ४८ हजार १३२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. सकाळी लिलाव सुरू होतात कांद्याला ३०० ते ९७५ असे बाजार निघाले. यातील बहुतांशी कांदा हा ३०० ते ४०० दरम्यानच विकला जाऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी एकत्रित येत कांदा लिलाव बंद पाडले. त्यानंतर बाजार समिती सभापती विलास शिंदे, सचिव अभय भिसे, संचालक बाबासाहेब खर्से, संतोष म्हस्के, शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, बहिरू कोतकर यांनी व्यापारी, शेतकरी यांची संयुक्त बैठक घेत समन्वय करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात सर्वत्रच बाजार पडलेले आहेत.


त्यामुळे नगरमध्येही कमी भावाच्या बोली लावल्या जात आहेत, तर शेतकऱ्यांनी किमान ११०० रुपयांच्या पुढेच बाजारभाव असावेत, अशी मागणी केली. त्याचवेळी तेथे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, तालुकाप्रमुख राजू भगत आले. त्यांनी काही शेतकऱ्यांना घेत आंदोलन सुरू केले. मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना त्यांनी दिले. एका बाजूला समन्वयाची बैठक, तर दुसऱ्या बाजूला आंदोलन सुरू होते. ज्या शेतकऱ्यांना कांदा विक्री मंजूर असेल त्यांनी कांदा विकावा व इतरांनी पुढील लिलावासाठी तो ठेवावा, असा मार्ग काढण्याचाही प्रयत्न झाला पण तो यशस्वी झाला नाही.


राज्यातही भाव कमी
कांदा बाजार जिल्ह्यात नव्हे, तर राज्यातही कमीच आहेत. आम्ही सर्वत्र माहिती घेतली असता राज्यात कोठेही ९०० रुपयांच्या पुढे आज बाजार भाव नाहीत. बाजार समितीतर्फे शेतकरी व्यापारी याचा समन्वय करण्याचा प्रयत्न झाला. संयुक्त बैठक बोलावून आम्ही प्रयत्न केले. पण सर्वत्र बाजार कमीच होते.
- अभय भिसे, सचिव, बाजार समिती.

 

अनुदान द्यावे
कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. त्यामुळे किमान १५०० च्या पुढे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळावा. शासनाकडे कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची ऑनलाइन माहिती आहेच. शेतकऱ्यांना १५०० रुपये क्विंटल बाजारभाव मिळेल या पद्धतीने शासनाने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.
- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य.

बातम्या आणखी आहेत...