आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: भेंडीच्या पिकातून पारधी कुटुंबाला मिळाली नवी दिशा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत- भेंडीच्या पिकाने बारडगाव दगडी येथील पारधी समाजातील काळे दाम्पत्याला उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली आहे. समाजासमोर त्यांनी आदर्श उभा केला आहे. पारंपरिक चाकोरी सोडून कष्टाच्या जोरावर हे कुटुंब उदरनिर्वाह करत आहे. नशिबी आलेले अठरा विश्व दारिद्र्य पुढील पिढीच्या नशिबी नको, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. 


बारडगाव दगडी हे अष्टविनायकातील सिद्धटेकच्या रस्त्यावरील गाव. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष रस्त्यालगत असलेली भेंडीची शेती वेधते. हिरवीगार भेंडी पाहून ती खरेदी करण्यासाठी पर्यटकांची पावले शेताकडे वळतात. सतीश देविदास काळे आणि त्यांची पत्नी निशा यांनी जिद्दीच्या जोरावर आपली आई रोहिणी देविदास काळे यांच्याकडून वारसा म्हणून मिळालेली शेती फुलवली आहे.


दिवस-रात्र कष्ट करून त्यांनी भेंडीचे पीक घेतले आहे. त्यांची पाच लेकरे आई-वडिलांना आपल्या कुवतीप्रमाणे मदत करतात. भेंडीने या कुटुंबांला चांगले दिवस आणत एक वेगळी ओळखही निर्माण करून दिली आहे. भविष्यात अजून एखादा शेतीचा तुकडा खरेदी करून चांगले पीक घेण्याचा मानस काळे दाम्पत्याने दैनिक दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला. सरकारी यंत्रणेनेही अशा गरजू आणि मेहनती कुटुंबाच्या पाठीशी उभे रहात त्यांच्या यशाला हातभार लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


श्रमाच्या मोबदल्यात समाधान 
शेतीत कष्ट करून चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत आहे. पत्नी निशा माझ्या बरोबरीने शेतात काम करते, याचे समाधान आहे. आम्ही आमच्या श्रमाचा मोबदला घेत असून त्यासाठी शेती व्यवसाय निवडला याचे समाधान आहे.
- सतीश काळे, शेतकरी. 


मुलीला डॉक्टर होण्याची इच्छा 
अनिशाही सतीश आणि निशा यांची तृतीय कन्या. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत अनिशाला डॉक्टर होण्याची इच्छा आहे. त्यांच्या शेतातील भेंडी खरेदी करणारे भांबोरे येथील तलाठी नंदकुमार गव्हाणे आणि वैभव कारंडे यांनी तिला मदतीचे आश्वासन दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...