आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरती: उद्या धावणार 1 हजार उमेदवार, 164 जागांसाठी 31 हजार 73 अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा पोलिस दलातील रिक्त १६४ जागांसाठी सोमवारपासून (१२ मार्च) भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या जागांसाठी राज्यभरातून तब्बल ३१ हजार ७३ अर्ज आले आहेत. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यानंतर दररोज दीड ते दाेन हजार उमेदवारांना या चाचणीसाठी बोलावले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी यंदा प्रथमच बायोमेट्रिक पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. भरतीची रंगीत तालीम पूर्ण झाली असून सोमवारपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

वाढत्या बेरोजगारीला कंटाळलेले, तसेच खाकी वर्दीची आवड असलेल्या हजारो उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केलेले आहेत. शहर व जिल्ह्यात १६४ पदे रिक्त आहेत. त्यासाठी तब्बल ३१ हजार ७३ अर्ज प्राप्त झाले. जिल्ह्यासह राज्यभरातील उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केलेले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डाॅ. अक्षय शिंदे, मनीष कलवानिया, पोलिस उपअधीक्षक अरुण जगताप यांच्यासह १५ पोलिस निरीक्षक, ११ सहायक पोलिस निरीक्षक, ३० पोलिस उपनिरीक्षक, तसेच २७५ पोलिस कर्मचारी या भरती प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहेत. पोलिस भरती पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी संपूर्ण पोलिस मुख्यालय मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण भरतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या धावण्याच्या चाचणीसाठी सुधारित चिप्स बसवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना तक्रार करण्यास संधी मिळणार नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व क्राइम ब्रँचचे पथक भरतीच्या ठिकाणी तळ ठोकून राबणार आहे. कोठे काही गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शुक्रवारी भरतीची रंगीत तालीम घेण्यात आली. सोमवारी पहाटे ५ वाजेपासून प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

जागा वाढवून देण्याची मागणी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी मैदानावर व्यायामाचा सराव करत आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र पोलिस भरतीमय वातावरण झाले अाहे. शासनाने जागा वाढवण्याची मागणी अनेक इच्छुकांनी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग या सारख्या वर्ग एक चे पद मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घालवण्यापेक्षा एक दोन वर्षे अभ्यास करून पोलिस, सैनिक, क्लार्क, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक होऊन कुटुंबाला ऊस तोडणीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणांनी ग्रंथालयात अभ्यास व मैदानावर घाम गाळायला सुरुवात केली. गेल्या आठ वर्षांत १३४५ तरुण पोलिस व सैन्यात दाखल झाले आहेत. देशाच्या व राज्याच्या वेगवेगळ्या भागात कर्तव्य पार पाडत आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये पाहिले, तर तेथे बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करून भरती झालेला पोलिस दिसून येतो. कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता पुस्तके, अभ्यासिका व क्रीडांगणाचा मोफत वापर करू देणारे हे एक आगळेवेगळे महाविद्यालय म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. आता होणाऱ्या पोलिस भरतीतही मोठया संख्येने तरुण पोलिस दलात दाखल होणार यात शंका नाही.


ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी दिवसभर अभ्यास करताना दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षेची दोन हजार पाचशे पुस्तके, स्पर्धा परीक्षेसंबंधी १२ दर्जेदार मासिके, १००० पेक्षा जास्त संदर्भग्रंथाची उपलब्धता, इंटरनेट मोफत वापर स्पर्धा परीक्षेची माहिती व अर्ज भरण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन व सहकार्य व आठवड्यातून एकदा तज्ज्ञाचे मार्गदर्शन, सराव चाचण्याचे आयोजन, आय. सी. टी. च्या माध्यमातून यापूर्वी यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती, भव्य क्रीडांगण, ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक गोळाफेक, लांब उडीसाठी शारीरिक शिक्षकांचे मार्गदर्शन याचा परिपाक म्हणून येथील विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यात अव्वल येतो. या स्पर्धा केंद्राचा आलेख दिवसेंदिवस उंचावत ठेवण्यासाठी प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, स्पर्धा परीक्षा समन्वयक व ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, शारीरिक शिक्षक प्रा. विजय देशमुख व प्रा. रमेश मोरगावकर हे प्रयत्न करीत आहेत.


गैरप्रकार होणार नाही
भरती प्रक्रियेत पैशांची मागणी करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कोणी पैशांची मागणी करत असेल, तर पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, सहायक पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचे पोलिस प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...