आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची अकार्यक्षमता: आरोपींना अटक होत नसल्याने पीडित मुलगी, तिचे कुटुंब व संपूर्ण गावच दहशतीखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुंडांच्या दहशतीमुळे शैक्षणिक जीवनात अतिशय हुशार असलेल्या मुलीचे शिक्षण बंद करून तिला कुलूपबंद ठेवण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर येण्याच्या घटनेला आता दीड महिना उलटून गेला आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी गुंड गणेश अप्पासाहेब शेळके (वय ३०) व सोमनाथ ऊर्फ सिद्धेश्वर मेंगडे (वय २८) यांचा जिल्हा सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन फेटाळला, तरी त्याला कर्जत पोलिसांचे 'खास अभय' असल्याने अद्याप अटक होऊ शकलेली नाही. कायद्याचे रक्षक कसे भक्षक होतात, याचे हे उदाहरण आहे.

 

ही घटना संपूर्ण देश हादरवणाऱ्या कर्जत तालुक्यातील व पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील असलेल्या कोरेगावातील आहे. विशेष म्हणजे, हे गावही कोपर्डीपासून जवळच आहे. आरोपींविरोधात आधीही गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांना घटनेनंतर दीड महिना उलटला, तरी कोणास अटक झालेली नाही.


संबंधित मुलगी शैक्षणिक जीवनात अतिशय हुशार आहे. ती विज्ञान शाखेत शिकत आहे. भविष्यात डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते, ते आता तसेच राहिले आहे. कारण तिच्या मनावर या घटनेचा मोठा आघात झाला आहे. तिच्या शारीरिक, मानसिक परिस्थिती व एकूणच भविष्यावर या घटनेचा विपरित परिणाम झाला आहे. सर्व सरकारी यंत्रणा गुंडांच्या पाठीशी असल्याने हतबल झालेल्या कुटुंबीयांनी मुलीचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलीबरोबरच कुटुंबातील इतर सात मुलींच्या शिक्षणाचे दारही बंद होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी देखील अशाच एका मुलीचे शिक्षण संबंधित गुंड गणेश शेळकेमुळे बंद झाले आहे. तसा गुन्हाही २०१४ मध्ये कर्जत पोलिस ठाण्यात दाखल आहे. तेही कुटुंब आजही दहशतीखाली वावरत आहे.

 

या गुंडांविरोधात ९ फेब्रुवारी २०१८ रोजी संबंधित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना चारचाकी वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बालकाचा लैंगिक अपराध विरोधी कायद्याचे कलम सात व आठ (पॉक्सो), विनयभंग करणे, चोरून मुलीचा पाठलाग करणे, अश्लील चाळे व हावभाव करणे, मुलीच्या अवतीभोवती गाडीने फेरी मारणे आदी अतिशय गंभीर गुन्हे दाखल झाले. राजकीय पाठबळ व पोलिसांची कृपादृष्टी यामुळे सध्या हे गुंड शिरजोर, तर पीडित कुटुंब दहशतीखाली अशी उलट परिस्थिती येथे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे दाद मागूनही काहीही उपयोग झालेला नाही. संबंधित अल्पवयीन मुलीला आधीपासून त्रास देत होते. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. एन. व्ही. गवारे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहेे, की आरोपी गणेश शेळकेचा पूर्वइतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्या विरोधातील आरोपही गंभीर स्वरूपाचे आहेत. काही गुन्ह्यांतून न्यायालयाने त्याला सोडलेले असले, तरी त्याच्या दहशतीमुळे कोणीही साक्षीदार साक्ष देत नाही व फिर्यादीस तडजोड करण्यात भाग पाडले जाते. संबंधित गुन्हा अल्पवयीन मुलीने दाखल केलेला आहे.

 

कर्जत पोलिस गुंडाचे तारणहार
नेहमी सर्वसामान्यांना पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या पोलिसांनी संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असतानाही त्यांना अजिबात अटक केली नाही. पोलिसांच्या दृष्टीने ते फरार आहेत. परंतु दररोज ते सर्रास गावात फिरत आहेत. त्यांची तालिम आहे. त्यांच्याबरोबर नेहमी पैलवानांची टोळी असते. त्यामुळे त्यांची गावात मोठी दहशत आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही बोलत नाही. तो सर्रास दररोज कोरेगावातून फिरत आहे, मात्र पोलिसांना सापडत नाही. या घटनेपुरते बोलायचे झाल्यास पोलिस गुंडांचे तारणहार ठरत आहेत.

 

आरोपींना फरार का घोषित करत नाही?
घटनेनंतर दीड महिन्यापासून आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. इतक्या संवेदनशील घटनेतही पोलिसांची निष्क्रियता संशयास्पद आहे. पोलिस व गुंड शेळके याच्या हितसंबंधाची उघड चर्चा कर्जतमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळेच पोलिस त्याला पकडत नसल्याचे बोलले जात आहे. खरोखरच आरोपी फरार असतील, तर पोलिस त्यांना क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ च्या कलम ८२ प्रमाणे फरार का घोषित करत नाहीत, असा कायदे तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केला आहे.


पीडितेच्या संरक्षणाची मागणी
दरम्यान, आरोपी, फिर्यादी व त्यांचे वकील अॅड. सुमित पाटील एकाच गावातील आहेत. पोलिस यंत्रणा संबंधित आरोपींच्या पाठीशी असल्याने ते सर्रास बाहेर फिरत आहेत. पोलिसांच्या लेखी मात्र ते 'फरार' आहेत. त्यांच्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, असे नमूद करत अॅड. पाटील यांनी फिर्यादी मुलीचे कुटुंब व त्यांच्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. तसा अर्ज त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिला आहे. अद्याप जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही त्यावर काही कार्यवाही केलेली नसल्याचे सांगण्यात आले.

 

तडीपारीचा प्रस्ताव धूळखात
आरोपी गणेश शेळके विरोधात कर्जत पोलिसांनी २५ जानेवारी २०१७ रोजी तडीपारीचा प्रस्ताव कर्जतच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे या बाबतीत गोपनीय अहवाल मागितला. त्यातही आरोपीस तडीपार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी २५ एप्रिल १७ रोजी चार जिल्ह्यांतून गणेशला हद्दपार करण्याची विनंती तत्कालिन प्रांताधिकाऱ्यांकडे केली. तो धूळखात पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...