आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुराकडे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ; सलग चौथ्या दिवशी वायू प्रदूषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सलग चौथ्या दिवशी शहराजवळील तपोवन रस्ता, श्रीरामचौक परिसरात दुर्गंधीयुक्त धुराचे लोट कायम असून, या धुरामुळे नागरिक त्रस्त झाले अाहेत. गेल्या चार दिवसांत या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली अाहे. एकही अधिकारी या भागाकडे फिरकलादेखील नसल्याचे उघड झाले. शहरात वायू प्रदूषणाची मोजणीच होत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

 

सावेडीतील कचरा डेपोला चार दिवसांपूर्वी आग लागली. महापालिका प्रशासनाने काही तासांत ही आग आटोक्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, तो फोल ठरला आहे. आगीनंतर रात्री साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली. तत्पूर्वी महापौर सुरेखा कदम यांनी कचरा डेपोची पाहणी केली होती.

 

कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट निघत असून, वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा धूर वेगाने पसरत आहे. धुरामुळे उपनगरातील तपोवन रस्ता, नम्रता कॉलनी, ढवणवस्ती, पाइपलाइन रस्ता, लेखानगर, भिस्तबाग नाका व महाल परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. लहान मुले व वृध्दांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सलग चौथ्या दिवशी या भागात धुराचे साम्राज्य कायम होते. मंगळवारी रात्री नगर-आैरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेल ते शेंडी रस्त्यापर्यंत धुराचे लोट दिसत होते. या मार्गावर वाहने चालवणेही कठीण होत होते. या प्रश्नावर माजी नगरसेवक दिगंबर ढवण, नगरसेविका शारदा ढवण यांनी महापालिकेत आंदोलन केले. धुरामुळे वायू प्रदूषण होत असताना गेल्या चार दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकारी या कचरा डेपोकडे साधा फिरकला देखील नसल्याचे उघड झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सावेडी येथील कार्यालयात आपल्या विभागाचे अधिकारी डेपोकडे गेेले होते का, असे विचारले असता कुठलाच अधिकारी गेला नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे शहरात वायू प्रदूषण मोजलेच जात नसल्याचे उघड झाले. वायू प्रदूषण मोजण्याचे काम सरकारने एका संस्थेला दिले आहे. ही संस्था नगरला फिरकतच नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अशी नगरची आेळख आहे. अशा जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाचा कारभार अवघ्या चार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चालतो. कार्यालयात तीन जण होते. त्यातील दोघे कार्यालयीन कर्मचारी आहेत. कार्यालयात आेसाड पडल्याचे दिसत होते.

 

धुरामुळे डोळ्यांची आग
धुरामुळे मोठी दुर्गंधी येते. डोळ्यांची आगही होते. डोळे सूजत असून, रात्रभर या धुरामुळे झोप येत नाही. घरात बसावे की घराबाहेर बसावे हे कळत नाही. या धुरामुळे भिती निर्माण झाली आहे.
- शीला गायकवाड, रहिवासी, तपोवन रस्ता.

 

नातेवाईकांना यायला भीती वाटते
कचरा डेपोची आम्हाला काही प्रमाणात सवय झाली असली, तरी गेल्या चार दिवसांपासून या डेपोतून धूर येत असल्याने आमचे नातेवाईक येथे येण्यासाठी घाबरतात. महापालिका प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात.
- साहेबराव जाधव, नागरिक.

बातम्या आणखी आहेत...