आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- विख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांचे 'कलर्स - द अॅप्लिक ऑफ ऱ्हिदम' हे प्रदर्शन हैदराबाद येथील 'पार्क हयात' येथे भरले आहे. आदिवासींच्या जीवनावरील वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील या प्रदर्शनाला हैदराबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन ३० जानेवारीपर्यंत खुले असेल.
हे प्रदर्शन म्हणजे अंगभूत भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या चित्रांचा आगळावेगळा संग्रह आहे. रानफुलांइतकीच निरागसता त्यांच्या जीवनात पहायला मिळते. मातीत रुजलेली नैतिकता, प्रामाणिकपणा, निष्पापपण ठाकूर यांनी रंग व कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर चितारले आहे. विविध प्रांतातील आदिवासींची जीवनशैली, त्यांची संस्कृती, परंपरा व त्या अनुरुप विलोभनीय वेशभुषा यांचा देखणा बाज त्यांनी या चित्रांतून रसिकांपुढे ठेवला आहे. आदिवासींच्या जीवनातील हाच ताल व लय त्यांच्या जीवनाचा आत्मा आहे याची अनुभूती चित्रकर्तीला आली व या चित्रनिर्मितीतुन ती रसिकांपुढे पोहचवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो.
आदिवासींच्या जीवनशैलीशी चित्रांच्या माध्यमातून जवळीक साधताना ही जमात लोककला, संस्कृती, सामाजिक, कौटुंबीक, तसेच व्यक्तिगत अशा सर्वच पातळ्यांवर सखोल एकजीव झाली आहे. त्यातूनच त्यांना हिरवाईतला जोम, फुलांचा गंध आणि झाडांमधील जीवनदायी चैतन्य परिसरात कुठेही नसतानाही मिळते, याचा प्रत्यय चित्रकर्तीला आला व तीच एकात्मता, चैतन्य त्यांच्या प्रत्येक चित्रात प्रतिबिंबीत झालेले दिसते. ठाकूर यांनी केलेले हे सर्जनशील सादरीकरण हा कलात्मक, उत्सवी व थक्क करुन टाकणारा आविष्कार आहे. रंगांची कलात्मक सरमिसळ, सुरेल व संवादी ताल आणि आनंदाच्या गाण्यांनी येथील आदिवासी लोकांना भारतातील इतर आदिवासी जमातींशी चित्ररुपाने जोडले आहे. ठाकूर चित्रांमधून आदिवासी जमातींच्या सूक्ष्म,चटकन न उमगणाऱ्या रिवाजांना नाजुक, हळुवार स्पर्शाने साकार करतात हा स्पर्श संवेदनशीलता जपणारा व आश्वासक वाटतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.