आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत गोहत्येचा तीव्र निषेध, कत्तलखान्यांवर कारवाई करण्‍याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - शहरातील कत्तलखान्यांमध्ये झालेल्या गोहत्येचा नागरिकांनी बुधवारी रस्त्यावर उतरून निषेध केला. शहर बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात असलेले अवैध कत्तलखाने बंद करून संबंधितांवर कारवाई न केल्यास आठ दिवसांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.

 

अवैध गोहत्या करणाऱ्या कत्तलखान्यांवर महाशिवरात्रीला जिल्हा पोलिसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या पथकाने कारवाई केली. राज्यातील हा सर्वात मोठा छापा ठरला. कत्तलखान्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नरेंद्र मोदी मंचाच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. कोपरगावकरांनी बुधवारी बंद पाळून निषेधासाठी मूक मोर्चा काढला. मोर्चात हजारो तरुणांनी भाग घेतला.

 

मोर्चाची सुरवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली. शिवाजी रस्ता, गांधी चौक, गांधीनगर, संभाजी चौक, आंबेडकर पुतळामार्गे गुरुद्वारा रस्त्यावरून तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहराध्यक्ष अस्लम शेख, विनायक गायकवाड, नगरसेवक सत्येन मुंदडा, संतोष गंगावाल, अनिल गायकवाड, योगेश बागूल, बालाजी आंबोरे, युवा सेना शहरप्रमुख सनी वाघ, सिद्धांत शेळके, कैलास खैरे, चेतन खुबानी, राजेंद्र खिल्लारी, वसंत जाधव, संजय कांबळे, उमा वहाडणे आदींसह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

 

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, कसायांकडून शहर पोलिस ठाण्याला एक लाख रुपये महिना हप्ता चालू आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी, बाजार समिती, पशुवैधकीय अधिकारी यांना किती हप्ता चालू आहे हे मला माहीत नाही. तालुक्यातील बडे नेते केवळ मतांच्या भिकेसाठी असे गैरकृत्य करणाऱ्यांना अभय देऊन त्यांची पाठराखण करतात ही शरमेची बाब आहे. चकार शब्द न काढता ते घरात बसले आहेत. याआडून हिंदू-मुस्लिमांमध्ये जातीय तेढ निर्माण करून कोणी भांडणे लावू पहात असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे एकाही गायीची हत्या केल्याचे कानावर आल्यास हत्या करणाऱ्यांनी पुढील परिणामास तयार रहावे.

 

मंजूर येथील शिवानंदगिरी महाराज, शिवाजी ठाकरे, संतोष गंगवाल, योगेश बागूल, सपना मोरे, कैलास जाधव, टेकचंद खुबानी, योगेश जगताप आदींचीही भाषणे झाली. शहरासह तालुक्यात असलेले अवैध कत्तलखाने बंद करून संबंधितांवर कारवाई न केल्यास आठ दिवसांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊ. पुढे होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी शासनाची राहील असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 

कोपरगावचे नाव बदनाम
कोयटे म्हणाले, गोहत्येमुळे कोपरगावचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले. गोशाळेला चाऱ्यासाठी शासकीय अनुदान द्यावे, तसेच कोकमठाण येथे जैन समाजाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या गोशाळेला आपल्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...