आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर चौथ्या दिवशी उपोषण मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- तालुक्यातील जवळे येथील सिध्देश्वर नदीच्या चार किलोमीटर पात्रात वर्षभरापासून अवैध वाळूउपसा करण्यात येत होता. त्याविरोधात रामदास घावटे २ जुलैपासून उपोषणाला बसले होते. चौथ्या दिवशी सायंकाळी प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्या मध्यस्थीने त्यांनी उपोषण सोडले. 


अवैध वाळूउपशाचे पंचनामे करून गुन्हे दाखल व्हावेत, या व अन्य मागण्यांसाठी घावटे यांनी नदीपात्रात उपोषण सुरू केले होते. पहिले तीन दिवस या उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवली. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको व गाव बंदचे नियोजन केले. परंतु जमावबंदीचे कारण देत त्यास मज्जाव केल्याने त्याचे रूपांतर निषेध सभेत झाले. या वेळी गावातील अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दिला. नायब तहसीलदारांनी लेखी आश्वासन नाकारल्याने उपोषण चालूच राहिले. 


संध्याकाळी सहाला प्रांत गोविंद दाणेज यांनी उपोषणस्थळी भेट देत वाळूउपशाची चौकशी करून कारवाई करू, असे लेखी पत्र दिले. ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा करत लेखी आश्वासन दिल्याने ज्येष्ठ नागरिक सखाराम पठारे यांच्या हस्ते नारळ-पाणी घेऊन घावटे यांनी उपोषण स्थगित केले. 


उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, या सर्व प्रकरणाची पंधरा दिवसांत सखोल चौकशी करण्यात येईल. येत्या दोन दिवसांत निघोज मंडलाधिकाऱ्यांकडून प्राथमिक चौकशी अहवाल आपण मागवला आहे. त्यानंतर मी पाहणी करणार असून अनधिकृत वाळूउत्खननाबाबत कारवाई करण्यात येईल. 


या वेळी संजय वाघमारे, शरद पवळे, बबनराव कवाद, रंजना पठारे, दत्ता भुकन, कृष्णाजी बडवे, भानुदास साळवे, किशोर सोमवंशी, नवनाथ सालके, दत्ता आवारी, संदीप पठारे, भाऊ आढाव, देवराम घोलप, गोरख सालके, गजानन सोमवंशी, नवनाथ सालके, बाळासाहेब पठारे, रमेश सालके, गंगाधर सालके, मंगेश सालके, बाबा कारखिले, तुकाराम अलभर, संदीप थोरात, काशिनाथ पठारे, शेखर सोमवंशी, किरण शिंदे, महेंद्र पठारे, अमोल कोठावळे, गोविंद बडवे, बाबाजी गाडीलकर, सतीश शेळके, श्रीधर पठारे, मंगेश सालके, संतोष सालके, ज्ञानदेव पठारे, श्रीधर गाडीलकर आदी उपस्थित होते. 


अन्यथा न्यायालयीन लढाई 
झालेल्या वाळूचोरीची चौकशी करून दोषींवर कारवाई करू. यापुढे तुमच्या गावात एक खडाही चोरी जाणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित केले असले, तरी कारवाई न झाल्यास याबाबत न्यायालयीन लढाई लढू.
- रामदास घावटे, उपोषणकर्ता. 

बातम्या आणखी आहेत...