आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरी बसस्थानक बनले चोरांचा हक्काचा अड्डा, पाकिटमारांचा सुळसुळाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी शहर - गेल्या आठवड्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवण्याच्या दोन घटना घडल्याने बहुजन सुखाय बहुजन हिताय हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या कारभाराला गालबोट लागले. येथील बसस्थानकातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

 

अंगावर घाण टाकून प्रवाशांच्या बॅगा पळवणे, बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणे, प्रवाशांचे खिसे कापणे, रात्रीच्या वेळी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मारहाण करून खिशातील पैसे काढून घेणे अशा घटनांचे सत्र सुरू असल्याने येथील बसस्थानक संपूर्ण जिल्ह्यात बदनाम झाले आहे. नगर-मनमाड राज्यमार्गावर, तसेच शिर्डी, शनिशिंगणापूर या जागतिक ख्याती असलेल्या धार्मिक स्थळांच्या मध्यवर्ती ठिकाणी राहुरी शहर असल्याने येथील बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असतानाही प्रवाशांना अपेक्षित असलेल्या सोयी, सुविधा व सुरक्षेचा अभाव आहे.

 

बसस्थानक परिसरात रात्री प्रकाश आवश्यक असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दिवाबत्तीची कुठलीही सोय नसल्याने रात्री १० नंतर नगर किंवा मनमाडच्या दिशेला जाणाऱ्या बसस्थानकात न येता परस्पर बाहेरून मार्गस्थ होतात. मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. छेडछाडीवरून मारामारीच्या घटना घडत असताना शहरात नियुक्त असलेल्या पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

 

बसस्थानकातील सोयी-सुविधांची वाताहत झाल्याची माहिती असूनही महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. बसडेपोच्या मागणीचे घोंगडे गेल्या ३ दशकांपासून भिजत पडले आहे. युती सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे मंत्री असताना एसटी डेपोचा प्रश्न मार्गी लागल्याची आवई विखे समर्थक, तसेच काही प्रसिद्धी माध्यमांनी उठवली होती. मात्र, डेपोचा प्रश्न अजून सुटलेला नाही. बसच्या बॅटऱ्या, टायर, चालकाकडील तिकिटांचे पैसे चोरीला जातात. त्यामुळे रात्री मुक्कामी बस थांबणे बंद झाले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तसेच पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, ही मागणी अनेकदा होऊनही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली. तालुकास्तरावरील १२ बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, ४ महिन्यांचा कालावधी उलटूनही कॅमेरे बसलेले नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...