आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब तहसीलदाराच्या अलीशान फ्लॅटमध्ये सव्वादोन लाखांचा एलइडी, एसी, महागडे मोबाइल, दागिने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लाचखोर पुरवठा निरीक्षक नायब तहसीलदार नितीन रमेश गर्जेच्या अलीशान फ्लॅटमध्ये तब्बल २ लाख २० हजार रुपयांचा एलईडी टीव्ही, महागडे फर्निचर, ब्रँडेड व महागडे दागिने, मोबाईल, महागड्या भेटवस्तू, दोन्ही बेडरुममध्ये दोन महागडे एसी, दागिने खरेदीच्या पावत्या, महत्वाची कागदपत्रे व पार्किंगमध्ये अलिशान कार आढळून आली आहे. गर्जेने अल्पावधीतच कमावलेले हे घबाड पाहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डोळेही दिपले आहेत. गुरुवारी सायंकाळी रेशनिंगच्या धान्याने भरलेला टेम्पो सोडण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना गर्जेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


रेशनच्या धान्याने भरलेला टेम्पो सोडवण्यासाठी दरमहा ५० हजार, याप्रमाणे ८ लाखाची मागणी करणाऱ्या लाचखोर पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यास (नायब तहसीलदार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. त्याच्याविषयी त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किशोर चौधरी व सहकाऱ्यांनी त्याला विशेष न्यायालयापुढे हजर करुन पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत गर्जेला रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


गर्जे हा सन २०१५ पासून सेवेत आहे. अवघ्या ३ वर्षांच्या कालावधीत पदाचा दुरुपयोग करुन संघटितरित्या रेशनिंग दुकानदारांकडून बक्षीसरुपात माया गोळा केल्याचा संशय लाचलुचपत िवभागाला आहे. त्याच्या घरात आढळलेल्या महागड्या व मौल्यवान वस्तू घरातील अन्य व्यक्तींच्या नावे आहेत. काही इतर व्यक्तींच्या नावे वस्तू खरेदी केलेल्या पावत्या आहेत. तसेच या गुन्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात वावर असलेल्या एका व्यक्तीचेही नाव आले आहे. या व्यक्तींचा व गर्जेचा काय संबध आहे, याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक चौधरी व सहकारी आता घेत आहेत. 


गर्जेच्या घरात आढळलेल्या महागड्या वस्तू, दागिने इतरांच्या नावे आहेत. तर मोबाईलसारख्या वस्तू आपल्याला भेट म्हणून मिळाल्याचे तो सांगतो. त्याच्या वरकमाईत महसूल विभागातील आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचाही तपासी अधिकारी शोध घेत आहेत. त्याच्या चौकशीत काही नावे समोर येत असल्याने महसूल विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. 


गेल्या आठवड्यातच तक्रार 
स्वस्त धान्य दुकानदारांकडून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून पैशांची मागणी केली जात होती. याबाबत (१३ जुलै रोजी नेवासे, श्रीरामपूर, श्रीगोंदे येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची भेट घेऊन तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने अटक केलेल्या गर्जे मार्फत पैसे मागितले जात असल्याचाही आरोप स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे. यापूर्वीही रेशन दुकानदारांकडून पैसे वसूल करण्याच्या तक्रारी केल्या जात असत. कडक शिस्तीचे व दरारा असलेले जिल्हाधिकारी राहूल िद्ववेदी यांच्या कार्यकाळात गर्जेने लाच घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


दिशाभूल करणारी माहिती 
गर्जेच्या चौकशीमध्ये मोठी अचंबित करणारी माहिती समोर येत आहे. गर्जे याने घराची झडती घेण्यासाठी निघालेल्या तपास पथकाला आपले घर भिंगारमध्ये असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली. भिंगारच्या महेशनगरमध्ये असलेले त्याच्या भावाच्या नावाचे घर प्रत्यक्षात कुलूपबंद आहे. अधिक चौकशीअंती तो बालिकाश्रम रोड परिसरात राजकीय नेत्यांच्या शेजारीच रहात असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे हे घर श्रीमंतांना लाजवेल, अशा प्रकारचे आहे. या तपासाचा आढावा घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे हेही शुक्रवारी नगरमध्ये दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...