आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळात नव्याने येणाऱ्या पाण्याचा मार्ग खुंटला, लाभक्षेत्रात काही काळ पावसाची हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- आर्द्रा नक्षत्रातील पावसाने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात काही काळ हजेरी लावली. तथापि, हा पाऊस पाणलोट क्षेत्रावर रूसल्याने धरणात नव्याने दाखल होणाऱ्या पाण्याचा प्रवाह खुंटला आहे. 


तब्बल आठवडाभर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. २६ जूनच्या रात्री १८० दशलक्ष घनफूट क्षमतेचे अंबीत, तसेच कोतूळजवळील ६५० दशलक्ष घनफूट क्षमता असलेले पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणलोट क्षेत्रातून मुळा नदीच्या दिशेने पाण्याचा प्रवास सुरू झाला. मात्र, कोतूळकडून अवघी ५६१ क्युसेक आवक सुरू असल्याने मंदगतीचे पाणी साकूर, मांडव्यापर्यंत पोहेचले आहे. 


मुळाचे कोरडे पात्र व वाळूचे खड्डे भरून या पाण्याला पुढचा प्रवास करावा लागणार आहे. कोतूळकडून मुळा धरणात पाणी पोहोचण्यासाठी किमान ५ हजार क्युसेक पाण्याची आवक गरजेची आहे. तथापि, घाटमाथ्यावर पाऊस थांबल्याने मुळा धरणात पोहोचणाऱ्या पाण्याचा प्रवास लांबणीवर पडला आहे. मागील वर्षी २ जुलैला कोतूळकडून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६ हजार ५९२ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील साठा वाढण्यास सुरवात झाली होती. वातावरणातील बदल पहाता पाणलोट क्षेत्रात पाऊस पडेल, असा अंदाज रोजच बांधला जातो. मात्र, पाऊस नसल्याने हवामान खात्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे अंदाजदेखील फोल ठरले आहेत. 
मुळा धरणातील पाणीसाठा ४ हजार ७३९ दशलक्ष घनफूट, तर पाण्याची पातळी १७५३.१५ फूट आहे. मागील वर्षी २ जुलैला धरणात ५ हजार ४१६ दशलक्ष घनफूट साठा होता, तर पाण्याच्या पातळीची १७५६.७० फूट नोंद झाली होती. 


घाटावर पाऊस नाही 
घाटमाथ्यावर पाऊस नसल्याने मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोतूळकडून पाणी दाखल होण्याचा मार्ग मंदावला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झालेली नाही.
- एन. बी. खेडकर, उपअभियंता, मुळा धरण. 

बातम्या आणखी आहेत...