आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल देवेंद्रला सील ठोकताच 15 मिनिटांत 6 लाखांची वसुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटवल्यानंतर महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी थकीत मालमत्ता करवसुलीसाठी कंबर कसली आहे. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. बुधवारी दुपारी खासदार दिलीप गांधी यांचे बंधू अनिलकुमार मनसुखलाल गांधी यांच्या कापडबाजारातील हॉटेल देवेंद्रला मनपा कर्मचाऱ्यांनी सील ठोकले. कारवाईची माहिती मिळताच गांधी यांनी अवघ्या पंधरा मिनिटांत ६ लाखांची थकबाकी धनादेशाद्वारे भरली. त्यानंत हॉटेलचे सील काढण्यात आले.

 

शहरातील बड्या धेंडांनी महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. या थकबाकीदारांमध्ये उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक संस्था, रुग्णालये, तसेच शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. प्रत्येक बड्या थकबाकीदाराकडे दहा लाखांपासून एक ते दीड कोटीपर्यंतची रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून थकीत आहे. खासदार दिलीप गांधी यांचे बंधू अनिलकुमार यांच्या मालकीचे कापडबाजारातील हॉटेल देवेंद्रचा सहा लाखांचा मालमत्ता कर थकीत होता. वेळोवेळी नोटिसा बजावूनदेखील हा थकीत कर भरला नव्हता.


अखेर द्विवेदी यांच्या आदेशानुसार मनपा कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी हॉटेल देवेंद्रला सील ठोकले. कारवाईची माहिती मिळताच अनिलकुमार यांनी सहा लाख रुपयांचा धनादेश मनपा कर्मचाऱ्यांना दिला. या कारवाईमुळे शहरातील अन्य मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. निर्ढावलेले काही बडे थकबाकीदार वर्षानुवर्षे मनपाच्या वसुली मोहिमेकडे दुर्लक्ष करत आहेत. यंदा मात्र जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आयुक्ताचा पदभार अाहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त होणार आहेत. सर्वसामान्य नागरिक कारवाईच्या भीतीपोटी नियमितपणे मालमत्ता कराचा भरणा करत आहेत. काही नागरिक तर अक्षरश: घरातील सोने मोडून थकबाकी भरतात. मग बड्या थकबाकीदारांना आतापर्यंत अभय का देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

शहरातील अनेक बड्यांनी थकवले १५ ते २० कोटी
एकीकडे मनपाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, तर दुसरीकडे शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत अाहे. हा विरोधाभास गेल्या अनेक वर्षांपासून आहे. एकूण रकमेपैकी शहरातील काही बड्या थकबाकीदारांकडेच १५ ते २० कोटींची रक्कम थकीत आहे. विशेष म्हणजे ही चालू थकबाकी नसून ती अनेक वर्षांपासूनची आहे. प्रशासनाने या थकबाकीदारांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या, परंतु प्रत्येक वेळी या नोटिसांना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळेच निर्ढावलेले हे बडे थकबाकीदार निश्चिंत आहेत.

 

सवलतीनंतर ४० कोटी जमा
महापालिकेची स्थापना होऊन एक दशक उलटले. या काळात शहरातील सुमारे एक लाख मालमत्ताधारकांकडे मालमत्ता करापोटी तब्बल दीडशे कोटी थकले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले. थकीत रकमेवरील शास्ती वेळोवेळी माफ करण्यात आली, तरीदेखील हे थकबाकीदार पैसे भरण्यास पुढे येत नाहीत. चालू अार्थिक ७५ टक्के शास्तीमाफी दिल्याने मनपाच्या तिजोरी सुमारे ४० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. आता जप्तीची कारवाई सुरू झाल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

बातम्या आणखी आहेत...