आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बंदी कारवाईत ७० हजारांचा दंड वसूल; धडक कारवाईमुळे व्यापारी व प्रशासन आमने-सामने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्लास्टिक बंदी अंमलबजावणीत महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत १४ कारवाया केल्या असून ७० हजार रुपयांची वसुली केली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. दरम्यान, या धडक कारवाईमुळे व्यापारी व प्रशासन आमने-सामने आले आहेत. 


प्लास्टिक बंदीनंतर महापालिकेने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. भाजीविक्रेत्यांकडेही मंगळवारी प्लास्टिक पिशवी दिसली नाही. मनपाचे पथक विविध व्यावसायिकांकडेही छापे घालून दंडात्मक कारवाई करत आहे. पाच हजारांचा भुर्दंड बसत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मनपाने आतापर्यंत १४ जणांकडून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे ७० हजारांचा दंड वसूल केला. सोमवारी सुशांत गांधी (भिस्तबाग), भोमसिंह राठोड (राठोड), रुद्रा बिकानेर स्वीटस् तीलाराम जाखड, राजलक्ष्मी स्वीट्स, राजपुरोहित (बिकानेर स्वीटस्) या व्यावसायिकांना पाच हजार दंड करण्यात आला. भिस्तबाग चाैकात सुशांत कापड दुकानात रेडिमेड कपड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या आढळून आल्या. पथकाने दुकानमालकाला दंडाची पावती दाखवली. त्यानंतर व्यापारी तेथे पोहोचले. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकान बंद ठेवले. दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. कुमार सारसर, पी. एस. बीडकर, सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश वाल्मिक, संजय चाबुकस्वार या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, श्रीरामपूरमध्येही पाच व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...