आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवाशात रंगला देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - भर पावसाच्या पुनर्वसू नक्षत्राच्या रिमझिम सरींमध्ये मान्यवरांसह श्री क्षेत्र देवगड दिंडीचा महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला.

 

श्रीदत्त देवगड देवस्थानची दिंडीचे हे ४४ वे वर्ष आहे. या दिंडीचे पहिले रिंगण हा नेवासेकरांसाठी उत्सवाचा दिवस असतो. शिस्तबद्ध असलेली ही दिंडी महाराष्ट्रातील एक वैभवसंपन्न दिंडी मानली जाते. शुक्रवारी (६ जुलै) देवगडहून निघालेल्या दिंडीचे शनिवारी दुपारी नेवाशात आगमन झाले. या दिंडीचे जागोजागी स्वागत झाले. दुपारी ३ वाजता पांढऱ्याशुभ्र कनातींनी व भगव्या झेंड्यांनी सजवलेल्या नेवासे बस आगारात दिंडी आली. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीच्या स्वागताला सभापती सुनीता गडाख यांनी दिंडीचे पूजन केले. या वेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, एस. टी. विभागीय आगारप्रमुख प्रियंका उनवणे, नेवासे माजी आगार प्रमुख सुरेश देवकर, महेश मापारी, दत्तात्रय बर्डे आदी उपस्थित होते.


रिंगण सोहळ्यात प्रथम मानाच्या घोड्यासह शिवाजी महाराजांच्या वेशातील सारंगधर पानकडे यांनी रिंगण घातले. झेंडेकरी, टाळकरी व नंतर वारकरी यांचे रिंगण झाले. शाळकरी विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणीचे रूप घेतले होते. बदामबाई हायस्कूलच्या लेझिम पथकानेही रिंगणात भाग घेतला. जसजसा रिंगण सोहळा रंगत येत होता तसतसा हरिनामाचा गजर मोठा होत होता. दूध विक्रेते संघटना व बागवान यांचेकडून पाणी व चहा वाटप करण्यात आले.

 

दिंडीसाठी संपूर्ण नेवासे शहर सजले होते. रिंगण सोहळ्यानंतर दिंडी शहरात दाखल झाली. मुस्लिम समाजातर्फे खोलेश्वर मंदिर चौकात महाराजांचा सत्कार करून दिंडीचे स्वागत केले. नगर पंचायत चौकात सर्व नगरसेवक उपस्थित होते. ठिकठिकाणी फटाके फोडून फुले उधळून दिंडीचे स्वागत होत होते. ग्रामदैवत मोहनीराजांचे दर्शन, औदुंबर चौकामध्ये दुर्गा देवीचे दर्शन घेतले. या वेळी पुजारी सुभाष चव्हाण व अजय पठाडे यांनी सत्कार केला. रात्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दिंडी मुक्कामी असताना बदाम वस्त्रांगणचे शिंगी ब्रदर्स यांच्याकडून रात्री महाप्रसाद देण्यात आला व मंदिरात भास्करगिरी महाराजांचे कीर्तन झाले.

 

प्रत्येकाने आपल्या कामात पांडुरंग शोधावा
प्रत्येकाने आपल्या कामामध्ये पांडुरंग शोधावा, तीच खरी विठ्ठलभक्ती आहे. विठ्ठलाकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी चांगल्या पावसाची व बळीराजा सुखी होवो यासाठी साकडे घालणार आहे, असे भास्करगिरी महाराज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...