आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सोन्या'ची घागर दाखवून लुटणारी टोळी गजाआड; बदलापूरच्या व्यापाऱ्याची केली होती १० लाखांची लूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सोन्याने भरलेली घागर सापडल्याचा बनाव करत लुटमार करणारी टोळी पोलिसांनी गुरूवारी गजाआड केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपींकडून दीड लाखाची रोख रक्कम व खोट्या सोन्याने भरलेली घागर हस्तगत करण्यात आली. चौकशीतून अनेक गुन्ह्यांची उकल होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुदाम भागचंद चव्हाण, गोविंद शालिंदर जाधव (दोघे खेडले झुंगे, ता. निफाड, जि. नाशिक), देवदान श्रीमंत काळे व अक्षय श्रीमंत काळे (दोघे मिरी, ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी २८ जून रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील व्यापारी मंदार रविकांत गरुड यांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवत लूट केली होती. 

 

आरोपींनी गरुड यांना पाथर्डी तालुक्यातील आव्हाडवाडी ते कोल्हार रस्त्यावर सोने घेण्यासाठी बोलावले होते. आम्हाला धनाने भरलेली घागर सापडली आहे. त्यातील साडेतीन किलो सोने स्वस्तात विकायचे आहे, असे आरोपींनी सांगितले. गरुड हे स्वस्त सोन्याच्या लोभाने पाथर्डीला आले. सोने खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपींनी त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील सोने, रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधार कार्ड असा सुमारे १० लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. याप्रकरणी गरुड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या शोधात होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना संबंधित आरोपी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथील असल्याची माहिती मिळाली. पवार यांनी आपले पथक खेडले झुंगे येथे रवाना केले. पोलिस पथकाने तेथे दोन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता ७ ते ८ आरोपींनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. चौकशीनंतर पाथर्डीतील दोन अशा एकूण चार आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. पवार यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्टे, सुधीर पाटील, सुनील चव्हाण, उमेश खेडकर, योगेश गोसावी, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विनोद मासाळकर आदींनी ही कामगिरी केली.

 
जिल्ह्यात सर्वाधिक टोळ्या 
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लूट करणाऱ्या टोळ्यांची संख्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. काही टोळ्या पकडल्या गेल्या असल्या, तरी आणखी काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वस्तात सोन्याच्या आमिषाला बळी न पडता जागरूक रहावे. आमिष दाखवताच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शर्मा यांनी केले आहे. 


अशी केली कारवाई 
पोलिस निरीक्षक पवार यांनी आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत तपासली. उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले यांच्यासह दोघांना बनावट ग्राहक बनवून सोने खरेदीसाठी आरोपींकडे पाठवले. पकडलेल्या दोन आरोपींपैकी एकास फरार आरोपी परश्या विलास भोसले व देवदान श्रीमंत काळे यांना फोन करण्यास सांगितले. खोपोली येथून पार्टी येत असल्याची माहिती त्यांनी दिली. बनावट ग्राहक झालेले पोलिस मिरी ते शिराळ रस्ता या ठिकाणी गेले. आरोपी परश्या व देवदान यांनी लुटण्याची तयारी केली होती. इतर पोलिस दुचाकीवर पोहोचले. पोलिस अधिकारी हिंगोले (बनावट ग्राहक) यांच्याकडे आरोपी आले. हिंगोले यांनी संकेत देताच साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


अशी केली जात असे लूट... 
आरोपी सुरूवातीला स्वस्तात सोने घेणारे सावज शोधत. त्यानंतर संबंधित व्यक्तीला आपल्याकडे पुरातन सोने असून ते स्वस्तात विकायचे असल्याचे सांगत. सुरूवातीला काही खरे सोने आरोपी दाखवायचे. सौदा पक्का झाल्यानंतर ठरावीक ठिकाणी संबंधित व्यक्तीला बोलावले जायचे. तेथे त्याला लुटण्याची अगोदरच तयारी केलेली असायची. संबंधित व्यक्ती सोने घ्यायला आल्यानंतर त्याच्याकडील पैसे, सोने, गाडी, एटीएम कार्ड, एवढेच नाही तर कपडेदेखील आरोपी काढून घेत. 


अशी होती घागर 
सोन्याने भरलेली घागर सापडल्याचा बनाव आरोपी करत होते. या लुटीसाठी वापरलेली घागर पुरातन दिसावी, याची खबरदारी आरोपींनी घेतली होती. जुनाट तांब्याच्या घागरीत सोन्याच्या अंगठ्या ठेवल्या होत्या. या सर्व अंगठ्या पितळी असल्या, तरी त्या सोन्याप्रमाणे चमकत होत्या. घागरीला चांदीची साखळी लावलेली होती. त्यामुळे समोरचा व्यक्ती या सोन्याच्या आमिषाने आरोपींच्या सहज जाळ्यात सापडत असे.  

बातम्या आणखी आहेत...