आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धूम'स्टाईल चोरट्यांनी दिले पोलिसांना आव्हान, सीसीटीव्ही नसलेले स्थळ लुटीसाठी निवडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भरदिवसा गजबजलेल्या सोलापूर महामार्गावर युनियन बँकेच्या सावेडी शाखेची ११ लाखांची रक्कम दोन दुचाक्यांवरील चार चोरट्यांनी लुटून पोलिस यंत्रणेला मोठे आव्हान दिले आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. 'धूम'स्टाईल गळ्यातील सोन साखळ्या चोरणाऱ्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे.

 

मंगळवारच्या घटनेतही चोरट्यांनी वेगवान मोटार सायकलींचा वापर केला आहे. भर दिवसा ही घटना घडून व पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकेबंदी करूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नव्हता. चार चोरट्यांपैकी दोघांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते. उर्वरित दोघांनी हेल्मेट घातलेले होते. या बाबत निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक महेशकुमार सद््गुरू कात्रजकर (वय ३२) यांनी कँप पोलिस ठाण्यात उशिरा फिर्याद दिली आहे.

 

सकाळी साडेअकराच्या सुमारास नगर-सोलापूर रस्त्यावर चांदणी चौकापासून पुढे सुमारे दोनशे मीटर अंतरावर भिंगार नाल्याजवळ ही घटना घडली. चंादणी चौक नगरमधील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक आहे. तेथे कायम वाहतूक पोलिसही असतात. कॅश घेऊन जाणाऱ्या संबंधित गाडीत कोणीही शस्त्रधारी नाही, याचीही चोरट्यांना निश्चित माहिती असावी. त्यामुळेच त्यांनी हे धाडस केले असावे. यात दोन पल्सर दुचाकींचा वापर झाला. त्यांवर हे चार चोरटे होते. अपघाताचा बनाव करून गाडीतील एकास बोलण्यात गुंतवून ठेवायचे व दुसऱ्या गाडीवरील चोरट्यांनी गाडीतील रकमेची लूट करायची, असे चोरट्यांचे धोरण होते. त्यात ते पूर्ण यशस्वी झाले. कारण रक्कम घेऊन चोरटे शहराकडे गेले, तरी त्यांचा सुगावा लागू शकलेला नाही.

 

पैशांची पिशवी शिपाई नाथू केतन गोरे याच्या पायाशी आहे, इतकी अचूक माहिती चोरट्यांना कशी मिळाली, या बाबत पोलिस चक्रावून गेले होते. घटनेनंतर व्यवस्थापक महेशकुमार कात्रजकर यांनी कँप पोलिस ठाण्यात धाव घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. त्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पण, त्यांना कोणताही सुगावा लागू शकला नाही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लुटारूंची शोधमोहीम सुरू केली. शहरात सर्व नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत आहेत, पण रात्री उशिरापर्यंत त्यांना कोणताही सुगावा लागला नसल्याची माहिती समजली. या घटनेची शहरात चर्चा सुरू होती.

 

सराईत टोळीचा हात
या आधीही जिल्ह्यात बँकेतून रोकड लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात तर बँकेवर दरोडे घालण्याचे प्रकार झाले आहेत. ही लूट इतकी सफाईदारपणे करण्यात आली असल्याने तिच्यामागे सराईत गुन्हेगारांची टोळी असल्याचा अंदाज पोलिसांकडूनच व्यक्त केला जात आहे.

 

संवेदनशील परिसरात घटना
हा सर्व परिसर लष्कराच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलचे मुख्यालयही याच परिसरात आहे. शिवाय मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटर अँड स्कूलसाठी (एमआयआरसी) हाच रस्ता आहे. चांदणी चौकात लष्करी जवानांचीही मोठी वर्दळ असते. लष्करीदृष्ट्या अितशय संवेदनशील असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने तीचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.


'एटीएम' असुरक्षित
नगर शहरातील ७० टक्के एटीएम सुरक्षा रक्षक नसल्याने असुरक्षित आहेत. या एटीएमवर पाळत ठेवून ग्राहकांना लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण, खर्च वाढण्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक नेमण्यास बँका टाळाटाळ करत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील जाणकाराने सांगितले.

 

विशेष वाहनाचा वापर का नाही?
दोन लाखांहून अधिक रक्कम न्यायची असल्यास विशेष कॅश वाहनाचा वापर केला जातो. या वाहनाला संरक्षक जाळी असते. शिवाय त्यात शस्त्रधारी रक्षकही असतो. ११ लाखांची रक्कम साध्या मोटारीतून नेण्याचे कारण काय, ते समजू शकले नाही. युनियन बँक राष्ट्रीयीकृत बँक आहे. नगरमधील सर्व खासगी व सहकारी बँका कॅश नेण्यासाठी स्वतंत्र वाहन वापरतात. याबाबत युनियन बँकेतील कोणीही बोलण्यास नकार दिला.


पुढील स्‍लाइडवर चित्रांच्‍या माध्‍यमातून जाणून घ्‍या, कशी केली चोरी...

 

बातम्या आणखी आहेत...