आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोक्का', दरोड्याच्या गुन्ह्यातील टोळी जेरबंद, 5 जणांना न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोक्का व दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेली दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातून जेरबंद केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना संशयितांनी आपण अल्पवयीन असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने संशयितांच्या वयाचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देत असताना या पाचही संशयितांना १४ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी शनिवारी दिली.

 

पोलिस अधिक्षक कार्यालयात मुंडे व पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जेरबंद करण्यात आलेल्या टोळीबाबत माहिती दिली. मुंडे म्हणाले, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार व सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, कैलास देशमाने यांच्यासह राजकुमार हिंगोले, सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे, सुनील चव्हाण यांचे पथक पाथर्डी शहर व परिसरात रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मोक्का व दरोडेसाख्या गंभीर गुन्ह्यात फरास असलेले सराईत पाच ते सहा दरोडेखोर माणिकदौंडी भागात दरोडा टाकण्यासाठी मोटारसायकल वरुन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तातडीने पाथर्डी-माणिकदौंडी रोडवरील धनगरवाडी फाटा येथे सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच फाटा परिसरात तीन मोटारसायकली पाथर्डीकडे जाताना त्यांना दिसल्या.


संबधित संशयित हे दरोडेखोरच असल्याची खात्री पटल्याने पथकातील कर्मचाचाऱ्यांना बॅटरीचा प्रकाश दाखवून इशारा दाखवून या मोटारसायकली थांबवण्याचा इशारा देण्यात आला. मोटारसायकलींचा वेग कमी होताच पोलिसांनी त्यांना घेराव घातला. त्यांना ताब्यात घेत असतानाच त्यातील तीन जण अंधाराचा फायदा घेत मोटारसायकवरुन उड्या मारुन पसार झाले.पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांनी संदीप ईश्वर भोसले (२३), धोंड्या उर्फ धोंडीराम ईश्वर भोसेले (२४), मिलिंद ईश्वर भोसेले (२२), नवनाथ ईश्वर भोसेले (२०), पाल्या उर्फ जलील ईश्वर भोसले (वय२१) सर्व राहणार बेलगाव, तालुका कर्जत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक तलवार, एक लोखंडी टॉमी, एक लोखंडी कत्ती,१ लोखंडी गज,१ कटावणी, तीन मोटारसायकली, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. अटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले, नाज्या नेहऱ्या काळे (सर्व राहणार बेलगाव, तालुका कर्जत) हे तीन जण पळून गेले. अटक करण्यात आलेल्या संशयितांना शनिवारी पाथर्डी न्यायालयात हजर केले असता संशयितांनी आपले वय कमी असल्याचे न्यायालयाला सांगितले.त्यावर न्यायालयाने संशियतांचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असल्याचे पुरावे सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व संशयितांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी अटक केलेल्या संदीप ईश्वर भोसले याच्यावर बीड, जेजूरी येथे मोक्का व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. धोंडीराम ईश्वर भोसले याच्यावर कर्जत, आष्टी पोलिस ठाण्यात मोक्का व दरोड्याचे गुन्हे दाखल आहे. फरास असलेला अतुल ईश्वर भोसले याच्यावर बीड, कर्जत, आष्टी येथे मोक्का व दरोड्याचे गुन्हे दाखल आहे. अटक केलेल्या संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असताना पाथर्डी येथे एका वयोवृध्द महिलेचा खून करुन १ लाख ८२ हजार सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...