आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ठिय्या, रास्ता राेको व कर्जत बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत- सकल मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कर्जत सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी रात्रीपासून कर्जत तहसील कार्यालयात ठिय्या अांदोलन केले. शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको अांदोलन करण्यात आले, तर कर्जत बंदला प्रतिसाद मिळाला.

 
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजातर्फे ५८ मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या संवेदनहीन सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाही. तद्नंतर सद्यस्थितीला तुळजापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरू करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील परळी वैजीनाथ या ठिकाणी सकल मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिय्या अांदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्जत सकल मराठाच्या वतीने पाठिंबा देत गुरुवारी रात्री ९.३० वाजता कर्जत तहसील कार्यालयात ठिय्या अांदोलन सुरू केले, अशी माहिती समन्वयक नानासाहेब धांडे यांनी दिली. शुक्रवारी कर्जत बंदची हाक दिली होती. त्यानुसार व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला. सकाळी १० च्या सुमारास कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको अांदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासंबंधी कर्जत बंदमध्ये शहरातील सर्वच शाळा आणि महाविद्यालय यांनी कामकाज बंद ठेवत सहभागी झाले होते. या वेळी कर्जत सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार किरण सावंत यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. मुस्लिम बांधवांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा समाजास तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. 


उद्रेक होण्याच्या आत आरक्षण द्या 
सकल मराठा समाजास सरकारने तत्काळ आरक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत आगामी काळात होणारी शासकीय महाभरती स्थगित करावी. यासह अॅट्राॅसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी. कोपर्डी घटनेतील नराधमांना तत्काळ फाशी देण्यात यावी यासाठी ठिय्या अांदोलन करत आहोत. समाजाचा उद्रेक होण्याच्या आत सरकारने आरक्षणास मंजुरी द्यावी.
- नानासाहेब धांडे, समन्वयक - सकल मराठा समाज, कर्जत. 

बातम्या आणखी आहेत...