आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूबरोबर रस्ताही चोरला; कुणावरही कारवाई नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- वाळूतस्करांकडून शेतकऱ्यांच्या विहिरींवरील वीजपंप चोरण्याच्या घटनांचे सत्र तालुक्यात सुरू असतानाच मंगळवारी मध्यरात्री चक्क मुळा नदीपात्रातील रस्ताच चोरीस गेल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी बुधवारी दिवसभरात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. 


तालुक्याच्या पूर्व भागातील देसवंडी व तमनर आखाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. नदीपात्रातील रस्त्याची तोडफोड करत वाळू चोरून नेल्याने येण्या-जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. रस्ताच गायब झाल्याने देसवंडी व तमनर आखाडा गावाकडे राहुरी खुर्द, राजेश्वर महादेव या पर्यायी दूरच्या रस्त्याने दळणवळण करावे लागत आहे. 

 

गेल्या अनेक वर्षांपासून नदीपात्रातील वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा केला जात असताना महसूल व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. तेच या घटनेला कारणीभूत ठरले आहे. मुळा नदीपात्रातील वाळूच्या अमर्याद उपशामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 


नदीपात्रातील खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी वाळूउपसा करून गाढवावरून वाहतूक केली जाते. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी गावकऱ्यांनी करूनदेखील महसूल व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 


नदीपात्रातील वाळूचे प्रमाण घटल्याने वाळूतस्करांनी नदीपात्रातील येण्या-जाण्याच्या रस्त्याला लक्ष्य करत या रस्त्याची तोडफोड करून वाळू उचलेगिरी सुरू केल्याने येण्या-जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. राहुरी शहरातून देसवंडी व तमनर आखाड्याकडे जाण्यासाठी मुळा नदीपात्रातून सोयीचा व जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत गावकरी, तसेच शाळकरी मुलांची ये-जा सुरू असते. 


देसवंडी व तमनर आखाडा गावाकडे जाणारा रस्ता तोडण्यात आल्याची माहिती मिळताच संभाव्य धोका ओळखून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी तहसीलदार अनिल दौंडे यांना घटनास्थळी पाचारण करत हा प्रकार निदर्शनास आणून दिला. खेवरे यांनी जेसीबी बोलावून नदीपात्रात पर्यायी रस्त्याची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी स्वखर्चाने काम सुरू केले आहे. 


तोडफोड करणाऱ्यांचा शोध घ्या 
मुळा नदीपात्रातील वाळूतस्करीसाठी रस्त्याची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार दौंडे यांनी मंडलाधिकारी व तलाठ्यास दिले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाला हे उशिरा सूचलेले शहाणपण ठरले आहे. मुळा नदीपात्रातील वाळूतस्करी सर्वश्रूत आहे. मात्र, वाळूतस्करीसाठी चक्क रस्ताच गायब केल्याची घटना प्रथमच घडल्याने राहुरी तालुक्यात कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...