आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधाऱ्याच्या नावाखाली कोट्यवधींचा वाळूउपसा; रामदास घावटे यांची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निघोज- लोकसहभागाच्या गोंडस नावाखाली जवळ्यात वाळूतस्करांचा हैदोस सुरू अाहे. पारनेरचे महसूल अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. 


जवळा येथे खबडी मळा परिसरात लोकसहभागातून बंधारा बांधायचा असल्याचे दाखवून वाळूतस्करांनी ग्रामसभेची बोगस मंजुरी मिळवत महसूल कर्मचाऱ्यांशी आर्थिक तडजोडी केल्या. कुठलीही मंजुरी, निविदा, जाहिरात, सरकारी निधी व परवानगी न घेता हे काम मार्गी लावले. हे काम पन्नास लाख रुपयांचे असून त्या बदल्यात काही कोटींचा वाळूउपसा संबंधितांनी केला. यावरून गावातील वाळूतस्कर व संबंधित ठेकेदारातील वाद विकोपाला गेला आहे. आपल्या गावातील वाळूचा उपसा आपल्या गावातीलच वाळूतस्करांनी करावा, बाहेरील वाळूतस्करांनी तो करू नये, असा निर्णय गावातील वाळूतस्करांनी घेतला असल्याचे समजते. गावातील व बाहेरील वाळूतस्करांत वाळूउपशावरून स्पर्धा लागली आहे. त्यातून संघर्षही होत आहेत. विपरीत दुर्घटना घडल्यास त्यास महसूल प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे. याबाबत वारंवार महसूल विभागाला कल्पना देऊनही केवळ गोड बोलून कारवाई करण्याचा शब्द मिळाला, असे घावटे यांनी सांगितले. 


बंधाऱ्याचे काम व बेसुमार वाळूउपसा करण्यासाठी पाठबळ दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाईची मागणी करणार आहोत. अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. न्यायालयात जाण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, अशी अपेक्षा घावटे यांनी व्यक्त केली. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...