आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीतील सहा एकरांवरील साईतीर्थ हे थीम पार्क पर्यटकांचे अाकर्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर -  श्री साईदर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध हाेण्याच्या दृष्टीने शिर्डीत अाता ‘साईतीर्थ’ हे थीम पार्क उभारण्यात अाले अाहे. ते देशभरातील भाविकांसाठी व धार्मिक पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांसाठी अाकर्षणाचे स्थळ बनले अाहे.  


साई मंदिरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर सहा एकरांच्या भव्य प्रांगणात ‘साईतीर्थ’ थीम पार्कची उभारणी करण्यात आली. साईतीर्थच्या प्रांगणात प्रवेश करताना पुरातन वास्तुशिल्पाचा नमुना वाटावा, असे महाद्वार व कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भव्य सूर्यरथाच्या चक्राची चाळीस फुटी प्रतिकृती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. ‘साईतीर्थ’मध्ये साईबाबांची द्वारकामाई, लंडनच्या विश्वविख्यात कंपनीने रोबाेटिक्स टेक्नोलॉजीचा वापर करून बनवलेल्या साईबाबा आणि त्यांच्या भक्तांच्या हलत्या प्रतिमा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आध्यात्मिक अाविष्कार ठरल्या आहेत.  


७२ फुटी विशाल रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा ‘सबका मालिक एक’ हा एक तासाचा चित्रपट साईबाबांचे शिर्डीतील वास्तव्य आणि महासमाधी कालखंडाला जिवंत करणारा एक सर्वांग सुंदर कलाविष्कार आहे. साईबाबांची अद‌्भुत लीला, त्यांनी घडवलेले चमत्कार आणि उदास- हताश मनाला बाबांनी दिलेली नवप्रेरणा याचे दर्शन या माहितीपटात आहे. याशिवाय शिर्डीत येणाऱ्या भाविकांना भारतीय संस्कृती व वाड्मयाचे दर्शन व्हावे, या हेतूने ‘लंकादहन’ हा ५ - डी सिनेमा थीमपार्कचे आकर्षण आहे. थरथरणाऱ्या प्रेक्षागृहात, हलणाऱ्या खुर्च्या, अंगावर प्रत्यक्ष पडणारा पाऊस, प्रेक्षागृहात अनुभवायला मिळणारा वादळवारा आणि त्याच्या जोडीला पडद्यावर चालणारा ५ - डी चित्रपट म्हणजे तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा अप्रतिम संगम ठरला.

 

हनुमानाच्या समुद्रउड्डाणापासून ते लंकादहनापर्यंतचा प्रवास क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके आणि मनातली उत्कंठा वाढवतो. संगमनेरच्या मालपाणी उद्योग समूहाने या पार्कची उभारणी केली अाहे.  

 

भारतातील दहा मंदिरांची तीर्थयात्रा  

‘टेंम्पल राइड’ अर्थात ‘तीर्थयात्रा’ बघण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सवर चालणाऱ्या बोटीत स्वार व्हावे लागते. गेटवे ऑफ इंडियातून प्रवेश करून विविध प्रांतांतला प्रवास या राइडमध्ये घडतो. देशातील दहा मंदिरांची तीर्थयात्रा या सफरीत घडते. प्रत्येक मंदिराचा परिसर, तिथली दृश्ये, संस्कृती पाहत त्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत नेले जाते. सरतेशेवटी ही तीर्थयात्रा शिर्डीत येते. होलोग्राफी टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रकट होणारी साईंची आशीर्वाद देणारी प्रतिमा प्रत्यक्ष साई-सान्निध्याचा अनुभव देते.

बातम्या आणखी आहेत...