आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: कोट्यवधींच्या सुगंधी तंबाखूची शहरात सर्रास विक्री; प्रशासन म्हणते, आमच्याकडे पुरेसे कर्मचारीच नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरात मावाविक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. मावा तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुगंधी तंबाखूची शहरात खुलेआम विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. कारवाईचे अधिकार नसतानाही केवळ तोडपाणी करण्याच्या उद्देशाने पोलिस या तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रार अर्ज केला आहे. शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

 

राज्य शासनाने सुगंधी तंबाखू व गुटख्यावर बंदी घातली असतानाही नगर शहरात मात्र खुलेआम ही विक्री सुरू आहे. सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, असे आदेश शासनाने २२ मार्च २०१६ मध्ये दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या निर्णयाला आव्हान देण्यात आले. त्यानुसार सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार केवळ अन्न व औषध प्रशासन विभागालाच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या आदेशानुसार राज्य शासनाच्या गृह विभागाने २२ मार्च २०१६ चा आदेश रद्द केला. सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार आता केवळ अन्न व औषध विभागालाच आहेत. असे असतानाही नगर शहर व जिल्ह्यातील सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाऐवजी पोलिसच कारवाई करत आहेत.

 

पोलिसांची ही कारवाई केवळ तोडपाणी करण्यासाठीच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे. तशी लेखी तक्रार देखील त्यांनी गृह मंत्रालयाकडे केली आहे. सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर छापे टाकून तोडपाणी न झाल्यास पोलिस अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवतात.


शेवगाव येथे एका मावा विक्रेत्यावर छापा टाकून तोडपाणी झाल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले, परंतु त्यातूनही काहीच निष्पन्न झालेले नाही. एकूणच शहरात राजरोसपणे सुरू असलेली सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री, पोलिसांनी केलेली कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागाची चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

 

पोलिसांकडूनही केवळ तोडपाणीपुरतीच कारवाई
नगर शहराच्या विविध भागात अशा पद्धतीने मावा तयार करण्यात येतो. नगरमध्ये तयार झालेला हा मावा दररोज जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद, बीड आदी ठिकाणी वितरित केला जातो. हा मावा तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुगंधी तंबाखूचे शहरात होलसेल विक्रेतेही आहेत.

 

पुरेसे मनुष्यबळच नाही
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. आहे त्या मनुष्यबळावर काम करावे लागत आहे. सुगंधी तंबाखू व गुटख्याबाबत आमच्याआधी पोलिसांना माहिती मिळते. त्यामुळे ते कारवाई करतात, आम्हालाही कळवतात. परंतु शासन निर्णयाप्रमाणे कारवाईचे अधिकार केवळ अन्न व औषध प्रशासनालाच आहेत. पोलिसांनी आम्हाला बरोबर घेत सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
- बी. एन. ठाकूर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

 

पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
शहरात राजरोसपणे चालतोय व्हिडिओ जुगार, असे वृत्त 'दिव्य मराठी'ने डिसेंबर २०१७ मध्ये प्रसिध्द केले होते. व्हिडिओ जुगार चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे काम पोलिसांचे नसल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. मात्र, सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार नसतानाही पोलिस कारवाई करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

आधी छापा मग पत्र
पोलिसांनी गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाला कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही. कारवाई केल्यानंतर अन्न व औषधला सांगण्यात आले. शेवगाव येथील लाखोंच्या सुगंधी तंबाखूच्या कारवाईबाबतदेखील हाच प्रकार झाला. मुळात अन्न व औषध प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपध्दतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...