आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून उभारली पहिली सेमी इंग्लिश अंगणवाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी ढोकेश्वर- खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पटसंख्येत वाढ होण्यासाठी शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळेत सेमी इंग्रजीचा पॅटर्न आणला आहे. पारनेर तालुक्यातील पानोली गावात अंगणवाडीतच सेमी इंग्रजी पॅटर्न आणला गेला असून लोकसहभागातून राज्यातील पहिली सेमी इंग्लिश अंगणवाडी उभारण्याचा मान पारनेर तालुक्यातील या गावाला मिळाला आहे. 


या सेमी इंग्लिश अंगणवाडीच्या उद््घाटनप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. राज्यभर हा प्रकल्प राबवण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या अंगणवाडीतील सोयीसुविधा व शैक्षणिक साधने पाहून ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. 


पानोली गावासह वाड्या-वस्त्यांवरील ४ ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड लागावी व इंग्रजीचे ज्ञान मिळावे यासाठी हा नवीन उपक्रम राबवण्यात आला असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी सांगितले. वाढत्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांना भक्कम पर्याय म्हणून पानोली ग्रामस्थांनी या नवीन उपक्रमाला सुरूवात केली. लोकार्पणप्रसंगी गायकवाड यांच्यासह माजी सरपंच नारायण गायकवाड, नानाभाऊ खामकर, शिक्षक प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.

 

विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले पानोलीचे भूमिपुत्र व ग्रामस्थांनी प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करून या अंगणवाडीसाठी ६ लाखांची लोकवर्गणी जमवली. या रकमेवर दरमहा मिळणाऱ्या व्याजातून एक शिक्षकाची नेमूणक करून त्याला मानधन देण्यात येणार आहे. यासाठी युवा नेते राजेंद्र गायकवाड व अंकुश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. या अंगणवाडीसाठी आणखी भरीव मदत करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे. 


इंग्रजीचा पाया अंगणवाडीतच पक्का 
आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी विषयाचे ज्ञान गरजेचे बनले अाहे. खासगी इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजीचे धडे गिरवले जातात. अंगणवाडीत खासगी शाळांप्रमाणे हे धडे दिले, तर ४ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा पाया पक्का होईल, असा विश्वास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...