आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूर देवस्थान वादग्रस्त नोकरभरती; १०६ कर्मचाऱ्यांची भरती अखेर रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- शनिशिंगणापूर देवस्थानच्या वादग्रस्त नोकर भरतीप्रकरणातील १०६ कर्मचाऱ्यांची भरती रद्द केल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त ज्ञानेश्वर दंडे यांनी जाहीर केले. दरम्यान, मंगळवारी शिंगणापूर गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. चौथ्या दिवशी रात्री उपोषणकर्त्यांनी मागितलेली कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांमार्फत मिळाल्यानंतर उपोषण थांबले, पण लगेच रद्द झालेल्या नोकर भरतीतील कर्मचाऱ्यांनी बडतर्फी विरोधात उपोषणाची तयारी सुरू केल्याने वाद चिघळला. 


सोमवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रात्री तहसीलदारांनी मध्यस्थी करूनही उपोषणार्थींना माहिती दिली नव्हती. मंगळवारी सकाळी धर्मादाय आयुक्त शिंगणापूरला दाखल झाले. त्यांनी विश्वस्तांची बैठक घेतली. सायंकाळी नोकर भरतीविषयीची कागदपत्रे उपोषणकर्त्यांना देण्यात आली. दरम्यान, विश्वस्तांची बैठक घेतल्यानंतर दुपारी उपोषणकर्त्यांकडे येऊन धर्मादाय आयुक्तांनी १०६ कर्मचाऱ्यांची भरती रद्द झाल्याची घोषणा केली. त्यावर उपोषणार्थींनी आमची मागणी नोकरभरती रद्द करण्याची नव्हती, तर नोकरभरती कशी झाली याची माहिती आम्हाला हवी असे स्पष्ट केले. दरम्यान, देवस्थानचा जेसीबी व डम्पर मंदिराजवळ आणण्यात आल्यावर पुन्हा एकदा गावकऱ्यांनी त्याची पूजा केली. 


उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते सरपंच बाळासाहेब बानकर यांची प्रकृती खालावली. मयूर देठे आणि नितीन शेटे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. देवस्थानच्या विश्वस्तांनी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी अध्यक्षांना रात्री थांबवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दुपारी दोननंतर नियुक्ती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांची मंदिराच्या आवारात गर्दी होऊ लागल्यानंतर तणाव निर्माण झाला. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांनी गर्दी हटवल्याने तणाव निवळला.सायंकाळी नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी शनी देवाला अभिषेक करून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले. 


न्यायालयात जाणार 
उपोषणानंतर प्रशासनाने वाहनांची यादी दिली. नोकरभरतीसंदर्भातील कागदपत्रे मिळाल्यावर त्वरित या गैरव्यवहाराविरुद्ध न्यायालयात जाणार आहोत.
- प्रकाश शेटे, शिवसेना. 

बातम्या आणखी आहेत...