आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीसाठी नगर सज्ज; विविध संघटनांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठी नगर शहर सज्ज झाले आहे. राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी यानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे हजाराे विद्यार्थी शहरातून भव्य मिरवणूक काढणार आहेत. छिंदम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सवास कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

 

उपमहापौर श्रीपाद छिंदम याने दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या या बेताल वक्तव्याचे नगरसह राज्यभर तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीला शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे हजारो विद्यार्थी सकाळी पारंपरिक पध्दतीने भव्य मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकीचे नगरकरांना दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठे आकर्षण अाहे. भगवे फेटे, लेझीम, टाळ-मृदुंग अशा पारंपरिक पध्दतीने ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, आयुक्त घनश्याम मंगळ व जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून विधिवत पूजा केल्यानंतर मिरवणुकीस सुरूवात होईल.

 

माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस सुरूवात होणार आहे. माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलिखूंट, चितळे रस्ता, दिल्ली दरवाजामार्गे ही मिरवणूक न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर येईल. हुतात्मा स्मारकात मिरवणुकीचा समारोप होणार आहे. यावेळी नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित असतील. शिवजयंतीनिमित्त राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिवमिरवणूक मार्गावरील रस्त्यांची महापालिकेतर्फे दुरूस्ती
शिवजयंतीनिमित्त महापालिकेने शहरातील मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे पॅचिंग केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची साफसफाई करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी छत्रपतींच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. भगवे झेंडेदेखील मोठ्या प्रमाणात विकण्यात आले.


महापालिकेवर गुढी उभारून छिंदमचा निषेध
पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शिवजयंतीला मनपा कार्यालयावर गुढी उभारुन श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे. या गुढीवर कॉम्रेड गोविंद पानसरे लिखीत पुस्तक ठेवले जाणार अाहे, अशी माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, कृती जीवनात आचरणात आणण्यासाठी व महाराजांचा इतिहास ज्ञात होण्यासाठी ही पुस्तकरुपी गुढी उभारली जाणार आहे. छत्रपतींबाबत गरळ ओकणाऱ्या छिंदम प्रवृत्तीचा निषेध करुन ही गुढी उभारली जाणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...