आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: शिवजयंती जल्लोषात, विद्यार्थ्यांनी काढलेली पारंपरिक मिरवणूक ठरले आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहरात सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. चौकाचौकांत छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची विधिवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पध्दतीने काढलेली मिरवणूक नगरकरांसाठी आकर्षण ठरली. जयघोष करत शिवप्रेमींनी छत्रपतींना अभिवादन केले.

 

दरम्यान, पदच्चुत उपमहापौर श्रीपाद छिंदम याने महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा शिवप्रेमींनी निषेध नोंदवला. पोलिसांनी चौकाचौकांत मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

 

माळीवाडा बसस्थानकाजवळील अश्वारुढ शिवपुतळ्यास जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापौर सुरेखा कदम, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, महापालिका आयुक्त घनशाम मंगळे, जिल्हा मराठा संस्थेचे जी. डी. खानदेशे, नंदकुमार झावरे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, प्रा. सिताराम काकडे आदी उपस्थित होते.

 

महाराजांना अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीस सुरूवात केली. मिरवणुकीत न्यू आर्टस् महाविद्यालय, रेसिडेन्सिअल हायस्कूल, छत्रपती अभियांत्रिकी, न्यू लॉ कॉलेज, महाराष्ट्र बालक मंदिर आदींचे विद्यार्थी सहभागी झाले. बालक मंदिर शाळेचे झांजपथक, लेझीमपथक, रेसिडेन्सिअलचे वारकरी वेशभूषा केलेले पथक सर्वांचे आकर्षण ठरले. फुलांनी सजवलेले रथ, त्यात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, तसेच मावळ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. डोक्यावर भगवा फेटा, हातात झेंडा, लेझीम अशा पारंपरिक पध्दतीने ही मिरवणूक माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलिखूंट, चितळे रस्ता, दिल्ली दरवाजामार्गे जाऊन न्यू आर्टस् महाविद्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात समारोप झाला.


शिवसेनेतर्फे स्वागत
नेता सुभाष चौकात शिवसेनेने मिरवणुकीचे स्वागत केले. शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सचिन जाधव आदी यावेळी उपस्थित होते. महापौर कदम व राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या झांज पथकात सहभागी होत ठेका धरला.

 

भाजपची दुचाकी रॅली
भाजपतर्फे पक्ष कार्यालयासमोर शिवजयंती साजरी करण्यात आली. खासदार िदलीप गांधी यांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, सुनील रामदासी, जगन्नाथ निंबाळकर, गौतम दीक्षित यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

 

राष्ट्रवादीचे अभिवादन
नगर शहरात सोमवारी सकाळी विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोड, नीलेश बांगरे, प्रा. अरविंद शिंदे, बाबासाहेब गाडळकर, प्रकारश भागानगरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात दुपारी कविता मेहत्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले.

 

छिंदमचा निषेध
शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमचा विविध संघटना व शिवप्रेमींनी निषेध केला. मार्केट यार्ड चौकात छिंदमचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला उलटा टांगण्यात आला होता. या पुतळ्यास भाजपचा पंचा घालून राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. पुतळा रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...