आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या गजरात सदानंदाचा येळकोट; कोरठणला वटपौर्णिमा उत्सवाला हजारो भाविक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथे वटपौर्णिमा उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. महिलांची गर्दी मोठी होती. मंदिराजवळ वटवृक्षाची पूजा करून महिलांनी देवदर्शन घेतले. 


सकाळी सहा वाजता श्रीखंडोबाचे मंगलस्नान व पूजा झाल्यानंतर सात वाजता श्रीखंडोबाला विधिवत अभिषेक व महापूजा, महाआरती पोपट व संगीता घुले, अशोक व अश्विनी शिंदे, तसेच धोंडिभाऊ व लक्ष्मी रांधवन यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, विश्वस्त किसन मुंडे, जालिंदर खोसे, शांताराम खोसे, रामदास मुळे, उत्तम सुंबरे, ज्ञानदेव घुले यांच्यासह हजारो भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. 


नंतर श्री खंडोबा उत्सवमूर्तीची पालखी मिरवणूक मंदिरातून वाजत-गाजत निघाली. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भाविक भंडारा-खोबऱ्याची उधळण करत पालखीचे लोटांगण दर्शन घेत होते. ढोल-ताशाच्या गजरात लेझीम खेळत सदानंदाचा येळकोटचा जयघोष करत लंगर तोडल्यावर पालखीला नैवेद्य दाखवण्याचा धार्मिक विधी होऊन पालखी मंदिरात परत आली. 


देवराम बाळा घुले यांच्या स्मरणार्थ पोपट घुले यांच्याकडून, तसेच अशोक शिंदे (डोंबिवली) व धोंडिभाऊ रांधवन (टाकळी ढोकेश्वर), कुशाभाऊ खोसे यांच्यातर्फे पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप झाले. देवस्थान ट्रस्टतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, वाहनतळ आदी सुविधा देण्यात आल्या. नुकताच पाऊस झाल्याने या परिसरात निसर्गरम्य वातावरण असून रोज गर्दी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...