आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळाखाली पुरेशी खडी न टाकता माती टाकल्याने तुटला रेल्वेचा रूळ? चौकशी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव परिसरात शुक्रवारी रेल्वेचा रूळ तुटल्याने गोवा एक्स्प्रेसचे इंजिन फसले. त्यावेळी रेल्वेचा वेग अतिशय कमी असल्याने मोठा अपघात टळला असला, तरी रुळांखाली पुरेशी खडी न टाकता माती टाकल्याने व भराव व्यवस्थित नसल्याने हा प्रकार घडल्याचे रेल्वेच्या तज्ज्ञ सुत्रांनी सांगितले. रेल्वेच्या सोलापूर विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी सुरू केल्याची माहिती समजली.

 

गुरुवारी रेल्वेच्या सोलापूर विभागाने नगर-दौंड दरम्यान विसापूर ते बेलवंडीदरम्यान मार्गाच्या कामासाठी दुपारी १२ ते ४ असा चार तासांचा 'मेगा ब्लॉक' घेतला होता. तो संपल्यानंतर थांबवण्यात आलेली गोवा एक्स्प्रेस सोडण्यात आली. नगरच्या स्टेशनमध्ये तिची वेळ एक वाजता असते. तिला तब्बल तीन तास उशीर झाला होता. ज्या रुळाचे काम झाले, त्याच रुळावरून गाडी येत होती. इंजिन ड्रायव्हरने गाडीचा वेग अतिशय कमी ठेवला होता. परंतु, गेट क्रमांक १४ च्या दरम्यान अचानक रूळ तुटला व इंजिन आठ ते दहा इंच जमिनीत फसले. ड्रायव्हरने तातडीने ब्रेक लावल्याने मागील डबे तसेच राहिले. पण इंजिन फसल्याने गाडी अडकून पडली. आधीच मातीचा भराव असताना रुळांखालीही मातीच जास्त प्रमाणात वापरण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. शिवाय येथील भरावाचे कामही व्यवस्थित झाले नव्हते.

 

अपघात झाल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. रात्री उशिरा दुसरे इंजिन आल्यानंतर डबे वेगळे करण्यात आले. ते दुसऱ्या इंजिनला जोडण्यात आले. त्यानंतर गोवा एक्स्प्रेस गाडी रात्री दोनच्या सुमारास रवाना झाली. त्यानंतर विसापूर स्टेशनमध्ये थांबवण्यात आलेली झेलम एक्स्प्रेसही त्यानंतर पुण्याकडे रवाना झाली. त्यानंतर मेंटेनन्स गाडी आली. त्या गाडीने इंजिन बाहेर काढले. पहाटे फसलेले इंजिनही तेथून रवाना झाले. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सकाळपर्यंत सुरू होते. सकाळी आठच्या सुमारास ते पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, या अपघाताच्या दोन्ही बाजूंना गाड्या अडकून पडल्याने त्यांना प्रचंड उशीर झाला. या गाड्या लांबपल्ल्याच्या होत्या. त्यात पुणे-जम्मू तावी झेलम, पुणे- हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे - पाटणा एक्स्प्रेस, तसेच दिल्ली - बेंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेसचा समावेश होता. या सर्वा गाड्यांतील प्रवाशांचे हाल झाले. हा अपघात अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. या प्रकाराची विभागनिहाय चौकशीही सुरू झाल्याची माहिती समजली.

 

रेल्वेच्या तत्परतेने टळली उपासमार
ही घटना झाल्यानंतर काही वेळाने गोवा एक्स्प्रेसमधील पँट्रीकारमधील सर्व खाण्याचे पदार्थ संपून गेले. पाणीही संपल्याने प्रवाशांवर बाका प्रसंग ओढवला. पण, याची माहिती समजल्यावर रेल्वेच्या कमर्शिअल विभागाने तत्परतेने हलचाली केल्या. त्यांनी खाद्यपदार्थांची पॅकेट बनवून घेतली, तसेच पाण्याच्या बाटल्यांचे पन्नास बॉक्स घेऊन तिकडे धाव घेतली. दरम्यान, दौंड होऊनही खाण्याची पॅकेट आली. याशिवाय रेल्वेच्या कमर्शिअल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विसापूर व परिसरातील दुकानांतून तांदूळ इतर आवश्यक सामानही खरेदी करून पँट्रीकारवाल्यांना दिले. त्यांनीही तातडीने जेवण बनवून पुरवल्याने किमान प्रवाशांची उपासमार तरी टळली.

 

संबंधितांवर कारवाई होण्याची गरज
जे काम झाले त्याची तातडीेने चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. रेल्वेने यात तत्परतेने हलचाली केल्याने प्रवाशांची किमान उपासमार झाली नाही. जेव्हा या मार्गाचे विद्युतीकरण झाले, तेव्हाच या मार्गाचे दुहेरीकरण करणेही आवश्यक होते. तसे झाले असते, तर इतर गाड्यांना उशीर किंवा त्या इतर मार्गाने वळवाव्या लागल्या नसत्या.
- हरजितसिंग वधवा, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

बातम्या आणखी आहेत...