आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास शनिवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यातून विविध ठिकाणाहून सुमारे १७५ पालख्यांसोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्रीसाईनामाच्या गजराने अवघी शिर्डी दुमदुमून गेली.
उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या फोटोची व श्री साईसच्चरित पवित्र ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाईपर्यंत काढण्यात आली. संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी वीणा, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व उपजिल्हाधिकारी मनोज घोडे पाटील यांनी श्रींची प्रतिमा व विश्वस्त अॅड.मोहन जयकर यांनी पोथी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाईत गेल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यात उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी प्रथम, सरस्वती वाकचौरे यांनी द्वितीय, विश्वस्त अॅड.मोहन जयकर यांनी तृतीय, साईभक्त अभय धाढीवाल यांनी चौथा व श्रीमती छायाताई दत्तात्रय शेळके यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले. सकाळी ६.१५ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी सहपरिवार श्रींची विधिवत पाद्यपूजा केली.
उत्सवाच्या प्रथम दिवशी महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी ४.०० वा. समाधी मंदिराशेजारील स्टेजवर ह.भ.प.श्री.विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन झाले. मंदिर परिसरात द्वारकामाई मंडळ, मुंबई यांनी उभारलेला श्रीशंकर भगवान व श्री साईबाबांची मूर्ती असलेला देखावा व विद्युत रोषणाई पाहण्यासाठी साईभक्तांनी गर्दी केली होती. तसेच मंदिर व मंदिर परिसरात दिल्ली येथील देणगीदार साईभक्त श्रीमती स्नेहा शर्मा यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. रविवारीही साईनगरीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मुंबईच्या भक्ताकडून ३९ लाखांची पंचारती अर्पण
श्रीरामनवमी उत्सवानिमित्ताने श्रींच्या नित्यांच्या आरतीसाठी मुंबई येथील दानशूर साईभक्त जयंतभाई यांनी ३९ लाख १ हजार ६८८ रुपये किंमत असलेली १३५१ ग्रॅम वजनाची सोन्याची पंचारती देणगी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपुर्द केली. ही सोन्याची पंचारती दैनंदिन आरतीसाठी वापरण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.