आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांचा घोळ: दोषींची नावे आज होणार उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरात पथदिव्यांची कामे न करता परस्पर बिले काढल्याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पण दोषींची नावे आयुक्तांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत. सोमवारी (१५ जानेवारी) ही नावे समोर येणार आहेत. त्यामुळे नेमके दोषी कोण व गुन्हे केंव्हा दाखल होणार याकडेच नगरकरांचे लक्ष लागले आहे.


शहरातील प्रभाग एक व २८ मध्ये करण्यात आलेल्या पथदिव्यांच्या कामात ४० लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला होता. दोन्ही प्रभागात ट्युबलर लाईट फिटिंगच्या सुमारे २० कामांत गैरव्यवहार असल्याचा आरोप झाल्यानंतर महासभेतही या घोटाळ्याचे पडसाद उमटले. बजेट रजिस्टर कामे न खतवता खोट्या स्वाक्षरी करून परस्पर बिले काढण्यात आल्याचा आरोपही विरोधी पक्ष नेत्यांसह नगरसेवकांनी केला होता.


गदारोळामुळे महासभा महापौर सुरेखा कदम यांनी तहकूब केली होती. याच सभेत कामांची फाईल दाखवण्यात विद्यूत विभाग अपयशी ठरला. तहकूब सभा दोन दिवसांनी पुन्हा घेण्यात आली, त्यात आयुक्त घनशाम मंगळे यांनी चौकशीसाठी अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे यांच्या समितीची नियुक्ती केली होती. पथदिव्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी, बजेट रजिस्टरची तपासणी, उपलब्ध असलेल्या प्रस्तावांसह त्यावर स्वाक्षऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांची साक्ष या चौकशीत घेण्यात आली. त्याबरोबरच प्रभाग १ व २८ मधील नगरसेवकांचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. अहवाल उघडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त मंगळे यांनी या प्रकरणात गंभीर अनियमितता व मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचा निष्कर्ष आला असल्याचे सांगितले. पण, गोपनीय असल्याने दोषींची नावे सोमवारी (१५ जानेवारी) जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. आस्थापना विभाग दोषींना नोटिसा बजावून म्हणणे घेऊ शकते. तत्पूर्वी अहवाल मिळावा यासाठी तक्रारदार तथा विरोधीपक्षनेते बोराटे यांनी आयुक्तांना पत्र देऊन अहवालाची प्रत मागितली आहे.

 

गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल का नाहीत?
पथदिव्यांचा गैरव्यवहार समोर येऊन आठ दिवस उलटले तरी दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत. मनपा प्रशासनाने पोलिसांना पत्र देऊन आवश्यक माहितीही सादर केली आहे. तथापि गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे नगरकरांमधून संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...