आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत व संस्कृतीच्या जतनासाठी ८४ व्या वर्षीही सुरू आहे धडपड...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- 'देववाणी' संस्कृत भाषेचे जतन व प्रसार करण्याबरोबरच नगर शहरातील सांस्कृतिक वातावरण समृद्ध व्हावे, म्हणून पेमराज सारडा महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. मधुसूदन बोपर्डीकर वयाच्या ८४ वर्षीही सक्रिय आहेत. मागील पाच दशके नियमित प्रकाशित होणाऱ्या 'गुंजारव' या संस्कृत त्रैमासिकाच्या संपादक मंडळात ते आहेत. शिवाय 'संस्कृत-संवर्धनम्' हे नियतकालिकही ते प्रकाशित करतात. भारतातील विविध राज्यांबरोबर परदेशांतही ही त्रैमासिके पोहोचली असून त्यांना चांगला प्रतिसाद आहे. 


संस्कृतमधून प्रकाशित होणारी मोजकीच नियतकालिके भारतात आहेत. त्यात नगरच्या सनातन धर्मसभेच्या 'गंुजारव'चा समावेश होतो. आर्थिक झळ सोसून हे नियतकालिक ५१ वर्षे अव्याहत प्रकाशित होत आहे. संस्कृतचे अध्ययन करणाऱ्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालय यांच्याबरोबरच परदेशांतील संस्कृतप्रेमींना 'गंुजारव' भावले आहे. 'गंुजारव'च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत डॉ. बोपर्डीकर यांचे मोठे योगदान आहे. 


मूळचे वाईचे असलेल्या डॉ. बोपर्डीकर यांनी आजोबा, वडिलांकडून मिळालेला संस्कृतप्रेमाचा वारसा जपला आहे. संस्कृत, अर्धमागधी, पाली या भाषांच्या अध्यापनाबरोबर डॉ. बोपर्डीकर यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखनही केले आहे. संस्कृत-प्राकृत हस्तलिखित सूची, अमृतकलश, मधुसंचय, स्त्री-शक्तीका असे ३५ हून अधिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. 
संस्कृत भाषेबरोबरच संस्कृतीचे जतन व नगर शहरातील सांस्कृतिक वातावरण चांगले होण्यासाठी डॉ. बोपर्डीकर प्रयत्नशील आहेत. 'स्वरानंद प्रबोधिनी'च्या माध्यमातून ते उत्तम गायक, वादक व संगीतकार घडवत असतात. स्वरानंद भक्तीमंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम त्यांनी केले अाहेत. नाट्यसंगीत हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून आजही ते सलग दोन-तीन तास संवादिनी आणि ऑर्गनवादन करू शकतात. 


श्रीसद््गुरु संगीत प्रतिष्ठान, बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठान, सावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंच, स्वानंद बाल संस्कार केंद्र, युवा गंधर्व रावसाहेब दुधाडे प्रतिष्ठान, अ. भा. गांधर्व महाविद्यालय अशा अनेक संस्थांशी डॉ. बोपर्डीकर संबंधित असून कुठल्या ना कुठल्या उपक्रमात ते सतत व्यग्र असतात. 


अलिकडेच डॉ. बोपर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आंख आ धन्य छे' या मूळ गुजराथी संग्रहातील ६७ कवितांचा संस्कृत अनुवाद केला. 'नयने इमे धन्ये रे' या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. मोदी पंतप्रधान म्हणून मोठे आहेतच, पण ते प्रतिभाशाली कवी, तत्वचिंतक, संस्कतिरक्षक आणि कमालीचे राष्ट्रनिष्ट असल्याने मी त्यांच्या काव्याच्या प्रेमात पडलो, मोदीरूप झालो, असे डॉ. बोपर्डीकर सांगतात. 


डॉ. बोपर्डीकर यांनी मागील एक तप अतिशय मेहनत घेऊन 'श्रीगुरु ज्ञानकोश' सिद्ध केला. अशा प्रकारच्या कोशाची निर्मिती एकट्याने करणे अवघड असते. पण वयाची आडकाठी न येता एखाद्या तरूणाच्या उत्साहात त्यांनी हे कार्य पार पाडले... 


पंतप्रधानांच्या कविता संस्कृतमध्ये 
'सूर्यपुष्पं रात्रौ प्रतीक्षां कुरुते, उदयोन्मुखसूर्यस्य, उदयपर: कदा सूर्य:, पुष्प-विकासकर:' (सूर्यफूल रात्रभर वाट पाहते उगवणाऱ्या सूर्याची की, केव्हा उगवेल सूर्य, फुलासारखा...) अशा उत्तमोत्तम रचना या संग्रहात आहेत. याच कवितांचा प्रासादिक मराठी भावानुवाद डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनी केला असून त्याचे प्रकाशन त्यांच्या वाढदिवशी, येत्या १३ जुलैला नगरमध्येच होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...