आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर व दुधाचे संकट हे केंद्र सरकारनिर्मित; खासदार राजू शेट्टी यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- हिंदुस्थानमध्ये साखरेचे साठे वाढल्याने निर्यात करण्याची गरज असताना केंद्रातील दळभद्री भाजप सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली. दूध भुकटीसाठी निर्यातीचे धोरण घेण्याऐवजी दुर्लक्ष केले. साखर व दुधाचे संकट हे केंद्र सरकारनिर्मित असल्याने भाजप सरकारला देशात व राज्यात निवडून येण्यास मदत केली, याची लाज वाटत असल्याची स्पष्ट कबुली खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 


दूध, साखर व उसाच्या भावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील टाकळीमिया येथे शेतकरी मेळावा झाला. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, म्हणून चर्चेसाठी गेलो असता सेंद्रिय शेती करा, असा सल्ला दिला गेला. दुधाच्या भावाची चर्चा केली असता जर्सी गायी विकून देशी गाई खरेदी करा, असे सांगितले जाते. देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना शेतीतील ज्ञान किती, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. 


हिंदुस्थानात टोमॅटोला दीड रुपया किलो बाजारभाव असताना पाकिस्तानमध्ये टोमॅटोचा भाव ३०० रुपये किलो होता. मात्र, सर्जिकल स्ट्राईक झाल्याने त्यांनी महागाचा टोमॅटो खाल्ला. मात्र, आपला टोमॅटो पाकिस्तानमध्ये येऊ दिला नाही. याउलट आपल्याकडे साखरेचे साठे वाढल्याने निर्यात करण्याची गरज असताना केंद्रातील दळभद्री भाजप सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केल्याने शेतीमाल व दुधाचे संकट भाजप सरकारनिर्मित असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. साखरनिर्यात धोरणात उदासीनता दाखवणाऱ्या केंद्र सरकारला उत्तरप्रदेश निवडणुकीत पराभवाची चपराक बसल्याने देशातील साखर ३ हजार रुपये क्विंटलवर स्थिर झाली आहे, असेही ते म्हणाले. 


मागील वर्षी शेतकऱ्यांनी ४२ कोटींचे कर्ज घेतले होते. यावर्षी शेती कर्जाचा आकडा २२ कोटींवर आला आहे. हे कर्ज शेतकऱ्यांनी नव्हे, तर बँकांनी नाकारले अाहे. एकीकडे कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नसतानाच दुसरीकडे या कर्जाच्या व्याजाचे तगादे बँकांकडून सुरू झाले आहेत, असे शेट्टी म्हणाले. भाजप सरकारने अर्थव्यवस्था मोडण्याचे काम केले असल्याने भरपाई देण्याचीदेखील तयारी सुरू करावी; अन्यथा भाजपच्या मंत्र्यांना देशात व राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांचीही भाषणे झाली. 


मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
शेतकऱ्यांच्या बायका काय रस्त्यावर पडल्या आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या घरातील बाईकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले असते, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का, असा सवाल करत खासदार शेट्टी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापक राजेश हिवसे प्रकरणावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. तुमचं गृहखाते काय करते? पुरावे असताना पोलिसांनी ही केस कोर्टासमोर सक्षमपणे मांडली नाही, असे ते म्हणाले.

 
..तर मंत्र्यांना दुधाने आंघोळ 
महाराष्ट्रात दैनंदिन १ कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. भाजप सरकारने दूध भुकटी निर्यात धोरण न राबवल्याने दुधाचे भाव मातीमोल झाले आहेत. राज्य सरकारने गुजरात व कर्नाटक सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत; अन्यथा भाजपच्या मंत्र्यांना दिसेल तेथे दुधाने आंघोळ घालण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...