आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावरेंना राज्यमंत्रिपदाऐवजी कॅबिनेट दर्जा बहाल करा; नगराध्यक्ष कैलास कोते यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी शिर्डीतील विकासकामे व पायाभूत सुविधांना मूठमाती देत साईबाबांच्या झोळीवर डल्ला मारून सरकारच्या मदतीने शेकडो कोटी विदर्भासाठी पळवले. त्यासाठी सरकारने हावरेंना राज्यमंत्रिपदाऐवजी कॅबिनेट दर्जा बहाल करावा, अशी टीका प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केली. 


पत्रकारांशी बोलताना कोते म्हणाले, साई समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हावरे यांनी मोठ्या घोषणा केल्या, पण एकही प्रत्यक्षात आली नाही. संस्थानच्या दोन्ही रूग्णालयांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. औषधे व डॉक्टरांची वानवा असताना विदर्भातील शासकीय मेडिकल कॉलेजचा जीर्णोध्दार करायला हावरे निघाले आहेत. 


केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शिर्डीत आल्यावर हावरे यांनी विदर्भातील लोकांच्या कल्याणासाठी संस्थानच्या तिजोरीतून कोट्यवधी रूपये दिले, मी पक्षासाठी किती काम करतो, शिर्डीचा शैक्षणिक विकास केला, रूग्णालयाची निर्मिती केली, तरीही लोक माझ्या नावाने टाहोहो फोडतात, असे सांगितले. मग जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत हावरे यांनी दोन वर्षात शिर्डीचा चेहरामोहराच बदलल्याचे सांगितले. हावरे यांनी वातानुकूलित दर्शनरांग बनवल्याचे सांगितले. किती बनवाबनवी करावी याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. या सर्व बाबींशी हावरे यांचा काडीचाही संबंध नाही. हा प्रकल्प कागदावरच आहे. रूग्णालय व शैक्षणिक प्रकल्प पूर्वीच्याच विश्वस्तांनी निर्माण केले असताना हावरे स्वत:चा उदोउदो करण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांनाही बनवतात. सरकारने त्यांना राज्यमंत्री नाही, तर कॅबिनेटचाच दर्जा बहाल करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत, असे कोते यांनी सांगितले. 


निधीचा वापर गोरगरिबांसाठीच 
संस्थानच्या निधीचा वापर गोरगरिबांसाठीच केला जात आहे. संस्थानच्या नियमावलीनुसार व राज्य सरकारच्या मान्यतेने आत्महत्याग्रस्त यवतमाळचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व नक्षलग्रस्त भागातील गरीब रूग्णांना वैद्यकीय सुविधांसाठी चंद्रपूरला संस्थानचा निधी दिला. नागपूर व औरंगाबाद येथील सरकारी रूग्णालयांनाही मदत केली. साईबाबांनी रूग्णसेवेला महत्त्व दिले होते. त्यांना अपेक्षित काम आपण करत आहोत.
- डॉ. सुरेश हावरे, अध्यक्ष, साई संस्थान, शिर्डी. 

बातम्या आणखी आहेत...