आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत फुल विक्रेत्यांचा माजी न्यायाधीशांना 6 हजारांचा गंडा, तक्रारीनंतर मिळाले पैसे परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी -  श्री साईदर्शनासाठी परिवारासह शिर्डीत आलेले उत्तर प्रदेशचे माजी लोकायुक्त व लखनऊ हायकाेर्टचे सेवानिवृत्त न्यायाधीश एन. के. मल्होत्रा यांना हार-प्रसाद दुकानदाराने जबरदस्तीने तब्बल सहा हजार रुपयांना गंडविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन जवळ घडली. मल्होत्रा यांनी ही माहिती संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाला दिली. संस्थानचे मंदिर सुरक्षा प्रमुख पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी घटनेची माहिती घेत तत्काळ सुरक्षारक्षकांना संबंधित दुकानदाराकडे पाठविले. सुरक्षा रक्षकांनी दम भरताच दुकानदाराने मल्होत्रा यांचे घेतलेले जास्तीचे सहा हजार रुपये परत केले.   


शिर्डीत भाविकांना फसविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भाविक तीव्र नाराजी व्यक्त करत असून, मंदिर सुरक्षाव्यवस्थेला या घटनांना पायबंद घालण्यास सातत्याने अपयश येत आहे.  मल्होत्रा हे परिवारासह गुरुवारी साईंच्या धुपारतीसाठी शिर्डीत आले हाेते. त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक तीनजवळ वाहन उभे करताच जवळच असलेल्या हार-प्रसाद दुकानदाराने त्यांना गाठले. ‘साईबाबा समाधी शताब्दी वर्ष चालू असून, गुरुवार असल्याने रिक्त हस्ते मंदिरात जाऊ नका’, असा सल्ला देत ‘हार-प्रसाद घेऊन जा’ असे दुकानदार म्हणाला. त्यामुळे मल्होत्रा हे भावनिक झाले. त्याचा  फायदा दुकानदाराने उचलत हार-प्रसादाची तीन ताटे जबरदस्तीने त्यांना देत त्यांच्याकडून प्रतिताट दाेन हजार रुपये दराने तब्बल सहा हजार रुपये लाटले. हे दर एेकून मल्हाेत्रा अवाक् झाले मात्र ते काही बाेलले नाहीत.

 

नंतर ते साईबाबा संस्थानच्या व्हीआयपी कक्षात येऊन बसले. त्यावेळी त्यांनी हा झालेला प्रकार पत्रकारांना सांगितला. ‘मी निस्सीम साईभक्त असून, वर्षातून मी एकदा साईदर्शनास येत असतो. यापूर्वी असा प्रकार अापल्याला अाढळून आला नाही. या वेळी मात्र हार-प्रसाद दुकानदाराने समाधी शताब्दी वर्षाचे निमित्त सांगत आम्हाला भावनिक करून पूजेच्या ताटाचे तब्बल सहा हजार रुपये उकळले’, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. मल्हाेत्रा हे उच्चपदस्थ असल्यामुळे मंदिर प्रशासनाने तत्काळ त्यांच्या तक्रारीची दखल घेतली अाणि संबंधित दुकानदाराला गाठून त्यांचे पैसे परत मिळवून दिले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...