आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दुकानदारांना प्रत्येकी 5 हजारांचा दंड, कॅरीबॅग बाळगल्याने मनपाकडून कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्लास्टिक व थर्माकोल बंदी कायद्याची शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने उपायुक्त, उपआरोग्याधिकारी, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी सावेडी उपनगरातील तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कॅरीबॅग बाळगणाऱ्या या दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

 

प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यभर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नगर शहरात कॅरीबॅग बाळगणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. उपायुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. या प्लास्टिकविरोधी पथकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. हॉटेल, दुकाने, हातगाडी, इतर व्यावसायिकांनी कॅरीबॅगचा वापर केल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कॅरीबॅग बाळगणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी सावेडी उपनगरातील तीन दुकानदारांवर कारवाई करून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडील कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, उपआरोग्याधिकारी डॉ. एस. एस. पैठणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.


प्लास्टिकविरोधी पथकाची ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. प्रभागातील नागरिक कॅरीबॅगचा वापर करतात का, केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार स्वच्छता निरीक्षकांना राहणार आहेत. नागरिकांनी कॅरीबॅगचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


दरम्यान, प्लास्टिक बंदीचा आदेश जाहीर होताच शहरातील दुकानदार, फळविक्रेते, तसेच इतर व्यावसायिकांनी स्वत:हून कॅरीबॅग ठेवणे बंद केले आहे. कारवाईच्या भीतीने काहींनी आपल्याकडील कॅरीबॅग स्वत:हून मनपा कर्मचाऱ्यांकडे जमा केल्या. या कारवाईमुळे शहरात बोकाळलेल्या कॅरीबॅग वापराला आळा बसण्यास मदत होणार आहे.

 

दुकानदारांनी कॅरीबॅग जमा कराव्यात...
प्लास्टिक विरोधी पथक तयार करण्यात आले असून प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांनी आपल्याकडील कॅरीबॅग महापालिकेकडे जमा कराव्यात, नागरिकांनी देखील खरेदीसाठी घराबाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी.

 

बातम्या आणखी आहेत...